साऊथमधील दिग्गज अभिनेता मोहनलाल रुग्णालयात!

साऊथमधील दिग्गज अभिनेता मोहनलाल याला कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला ताप, श्वास घेण्यास त्रास होणे आणि स्नायू दुखणे असा त्रास होत होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 20 Aug 2024
  • 10:16 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

साऊथमधील दिग्गज अभिनेता मोहनलाल याला कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्याला ताप, श्वास घेण्यास त्रास होणे आणि स्नायू दुखणे असा त्रास होत होता.

अधिकृत वैद्यकीय अहवालानुसार, मोहनलाल याला विषाणूजन्य श्वसन संसर्ग झाला आहे. त्याला पाच दिवस सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे.

मोहनलाल अलीकडेच गुजरातहून परतला. ‘एल २ : एम्पुरान’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून आणि त्याच्या दिग्दर्शनाच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्ट-प्रॉडक्शनचे काम करून, मोहनलाल नुकताच गुजरातहून कोचीला परतला होता. येथे प्रकृती बिघडल्याने त्याला दाखल करण्यात आले. सध्या त्याच्या तब्येतीत सुधारणा दिसून येत आहे.

‘बॅरोज’ हा चित्रपट यावर्षी २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. मोहनलाल याचा हा दिग्दर्शनातील पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट यापूर्वी २८ मार्च रोजी रिलीज होणार होता. मात्र, चित्रपटाच्या टीमने पोस्ट प्रोडक्शनमध्ये होत असलेल्या विलंबाचे कारण देत रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता असण्यासोबतच मोहनलाल एक चित्रपट निर्माता, पार्श्वगायक, वितरक, दिग्दर्शक आणि व्यापारीदेखील आहे. आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत त्याने सुमारे ४०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत त्याला पाच वेळा चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

लष्कराकडून मानद लेफ्टनंट कर्नल हे पद दिले जाणारा मोहनलाल हा पहिला अभिनेता आहे. त्याने एका वर्षात ३४ चित्रपटांमध्ये काम करण्याचा विक्रम केला होता, त्यापैकी २५ चित्रपट हिट ठरले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story