'धर्मवीर-२'ची प्रतीक्षा लांबली...

बहुप्रतीक्षित ‘धर्मवीर-२’ हा चित्रपट येत्या ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच कळवू, असे त्यांनी कळवले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 29 Jul 2024
  • 03:36 pm
Entertainment news, dharmaveer-2,  release on August 9, Praveen Tarde, social media, much-awaited movie, bollywood, film idustry

संग्रहित छायाचित्र

बहुप्रतीक्षित ‘धर्मवीर-२’ हा चित्रपट येत्या ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच कळवू, असे त्यांनी कळवले आहे.  

चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहेत, काही गावे पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता ‘धर्मवीर-२’ हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू.’’

दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘‘मंगेश देसाई तू निर्माता म्हणून मोठा होतासच आज माणूस म्हणून पण मोठा झालास... पाऊस-पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी असताना मी चित्रपट कसा प्रदर्शित करू? तुझ्या या भावनेचा मी आदर करतो. लवकरच नवी तारीख जाहीर करू...’’

 दरम्यान, सध्या या निर्णयामुळे काही चाहते नाराज झाले आहेत. तर अनेक चाहत्यांनी त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलिवुडस्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाला उपस्थित होती.

आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. यापूर्वीच या चित्रपटाचा टिझर देखील रिलीज झाला होता. टीझरसह, ट्रेलरला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली होती. दरम्यान, ट्रेलरमधील मधील संवादांवरून वाद निर्माण झाले होते. ट्रेलरमध्ये आनंद दिघे यांचे स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल असलेलं मत अधोरेखित करण्यासाठी एक हिंदी डायलॉग वापरण्यात आला आहे. ‘‘सावरकर समझने के लिए देशभक्त बनना पडेगा, किसी एक फॅमिली का कुत्ता नहीं...’’ असं आनंद दिघे बोलताना दिसतात. या संवादावरही आता आक्षेप घेण्यात आला आहे.

टीझरमध्येही प्रेक्षकांनी एक चूक लक्षात आणून दिली होती. त्यानंतर निर्मात्यांनी ही चूक सुधारणार असल्याचे सांगितले. टीझरमध्ये एक मुस्लिम महिला दिघे साहेबांकडे राखी बांधायला येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि साहेब संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात. महिलांना घेऊन जेव्हा आनंद दिघे निघतात, तेव्हा बाजूने लोकल जाताना दाखवली आहे. ही लोकल दिघे साहेबांच्या काळातली नाही, असे नेटकऱ्यांनी लक्षात आणून दिले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story