संग्रहित छायाचित्र
भारतात ‘म्युझिक ऑफ द स्फिअर्स वर्ल्ड टूर’च्या तिकिटांचा काळाबाजार होत असताना ‘कोल्डप्ले’ने भारतातील चौथ्या कॉन्सर्टची घोषणा केली आहे. हा शो पुढील वर्षी २५ जानेवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
या शोची तिकिटे येत्या शनिवारी (दि. १६) दुपारी १२ पासून BookMyShow वर उपलब्ध होतील. ‘कोल्डप्ले’ने याविषयीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केली आहे.
‘कोल्डप्ले’ने सप्टेंबरमध्ये पुढील वर्षी १८ आणि १९ जानेवारी रोजी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर दोन मैफिली सादर करण्याची घोषणा केली होती. पण लोकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहून बँडने २१ जानेवारीला त्याच ठिकाणी तिसरा शो करण्याची घोषणाही केली होती. यानंतर आता अहमदाबादमध्येही हा शो होणार आहे.
२०१६ मध्ये मुंबईत झालेल्या गोल्डन सिटीझन फेस्टिव्हलमध्ये कोल्डप्ले बँडने सादरीकरण केले. ८० हजार लोक या शोचे साक्षीदार बनले होते. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश होता. आता ९ वर्षांनंतर हा बँड पुन्हा भारतात येत आहे. ‘कोल्डप्ले’ची Hymn for the Weekend, Yellow, Fix You ही गाणी भारतात खूप लोकप्रिय आहेत.
‘कोल्डप्ले’ बँडची सुरुवात १९९७मध्ये लंडनमध्ये झाली. ख्रिस मार्टिन, जॉनी बॅकलँड, गाय बॅरीमन, विल चॅम्पियन आणि फिल हार्वे हे या बँडचे सदस्य आहेत. ‘कोल्डप्ले’ला ग्रॅमी पुरस्कारांत आतापर्यंत ३९ नामांकने मिळाली असून ७ वेळा त्याने पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे.