संग्रहित छायाचित्र
अभिनयाच्या जोरावर बाॅलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या हुमा कुरेशीचा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ हा पहिला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाने तिला तिच्या वजनाबद्दल सल्ला दिला होता.
२०१२ मध्ये ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या हुमा कुरेशीने आपल्या पहिल्याच चित्रपटात अविस्मरणीय अभिनय करत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. नुकतंच एका मुलाखतीत हुमाने ‘गँग्स ऑफ वासेपूर’ रिलीज झाल्यानंतरची एक आठवण सांगितली. इतर अभिनेत्रींच्या तुलनेत ती लठ्ठ होती. यामुळे तिला बाॅडी शेमिंगचा सामनाही करावा लागला.
पहिल्या सिनेमानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याशी तिची अचानक भेट झाली होती. याच भेटीत डेव्हिड धवन यांनी हुमाला शरीराच्या आकारावर करण्यात येणाऱ्या टिंगलटवाळीकडे लक्ष न देता अभिनयाकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.
हुमा म्हणाली, “‘गँग्स ऑफ वासेपूर’ नंतर मी एका कॉफी शॉपमध्ये डेव्हिड धवन यांना भेटले. त्यांना समोर पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी स्वतःहून माझ्याकडे येऊन मला एक सल्ला दिला होता. तो सल्ला माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांनी मला म्हटलं, ‘बेटा, तू खूप चांगली अभिनेत्री आहेस. तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण असं काहीही करू नकोस. प्रेक्षकांनी तुला स्वीकारलं आहे, त्याचं महत्त्व समजून घे. तुला फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे. त्यांनी दिलेला सल्ला मला खूप भावला. सिनेसृष्टीतील ज्येष्ठांकडून मिळालेला असा सल्ला खूप मोलाचा असतो.’’
हुमाने याच मुलाखतीत शरीराच्या नैसर्गिक रचनेबाबत तिचे विचार मांडले. “आपल्या देशात अनेकांना दुसऱ्याच्या सौंदर्याबद्दल आकर्षण आणि स्वतःबद्दल असमाधान असतं. जर तुम्ही नाकाची सर्जरी करून त्याचा आकार सुधारणार असाल तर नाक सुधारताना तुमची हनुवटी बिघडू शकते. लोकांना त्यांच्या नैसर्गिक रुपात राहू द्या,” असा सल्ला तिने दिला.