अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गावात शूटिंग

झी मराठीवरील अनेक मालिकांचे पश्चिम महाराष्ट्रात शूटिंग होते. सातारा वाई भागात सध्या अनेक मालिकांची शूटिंग सुरू आहेत. ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘पारू’ सारख्या मालिका साताऱ्यामध्ये शूट होत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 17 Jul 2024
  • 03:12 pm
zee marathi, western maharastra, satara aria, appi amchi collector, paru, marathi sereal, tv sereals, cinema

संग्रहित छायाचित्र

झी मराठीवरील अनेक मालिकांचे पश्चिम महाराष्ट्रात शूटिंग होते. सातारा वाई भागात सध्या अनेक मालिकांची शूटिंग सुरू आहेत. ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘पारू’ सारख्या मालिका साताऱ्यामध्ये शूट होत आहेत. तसेच नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका वाईमध्ये शूट होत आहे. वाईतील मयूरेश्वर गावात या मालिकेचे शूटिंग होत आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्य असणाऱ्या या गावात ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचे शूटिंग होत आहे. या मालिकेची तुळजा अर्थात अभिनेत्री दिशा परदेशीने शूटिंगचा अनुभव व्यक्त केला. यावेळी तिच्या शेड्यूलबद्दलही तिने माहिती दिली.

आम्ही सातारा, वाई भागात मालिकेचं शूट करतोय. वाईच्या आधी एक छोटेसे गाव पडतं मयूरेश्वर तिथे आमचा सेट आहे. आमचा वाडा आहे आणि आम्ही कलाकारही इथेच आसपास राहात आहोत. इथे शूट करण्याची खासियत म्हणजे हे ठिकाण खूप निसर्गरम्य आहे. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हिरवळच दिसते.  त्यामुळे माझा पूर्ण दिवस एकदम सुखकारक जातो. इथे शहरासारखी रहदारी नाही, गाड्या कमी असल्यामुळे हँकिंगचे प्रमाण कमी आहे. याचमुळे मी तुळजाचं पात्र खऱ्या अर्थाने जगत आहे, असे दिशा परदेशी म्हणाली.

साताऱ्यामध्येही प्रचंड पाऊस पडतो आहे.  फरक इतकाच की इथे मुंबईसारखे पाणी तुंबत नाही. त्यामुळे शूटिंगमध्ये बाधा येत नाही आणि इथे पावसाची मनसोक्त मज्जा घेता येते. मुंबईमध्ये अवतीभवती मोठमोठ्या इमारती दिसतात. पण इथे हिरवागार निसर्ग अनुभवायला मिळतो आणि पावसात इकडच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. माझा जन्म एका छोट्या शहरातला आहे. तिथेच माझे शालेय शिक्षण झाले आणि कॉलेज मुंबईतील रुईयामध्ये केले. कामासाठी मी जगभर फिरते पण कधी गावात शूटिंग करायचा अनुभव नव्हता मिळाला. पण ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेमुळे मला ही संधी मिळाली, असे दिशा म्हणाली.

इथे काम आणि मन दोन्ही प्रसन्नतेत सुरू आहे. शहरात ही गोष्ट कधीच अनुभवायला मिळाली नाही. इथेच एका घरात आम्ही जेवतो त्या मावशींची शेती आहे. त्या दररोज ताज्या भाज्या काढून आमच्यासाठी जेवण बनवतात. इतके  स्वादिष्ट जेवण मी आजपर्यंत कधीच खाल्लेलं नाही. एकदम ऑरगॅनिक आणि घरगुती जेवण मी शूटिंगवर खात आहे. अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे जितके मोर मी माझ्या पूर्ण आयुष्यात नसतील पाहिले तितके मी इथे या गावात पाहिले आहेत, असेही दिशाने सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story