संग्रहित छायाचित्र
मुंबईतील रस्ते, वाहतूक कोंडी याबद्दल अनेक मराठी कलाकार नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. यापूर्वी बऱ्याच मराठी कलाकारांनी मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडीमुळे शूटिंगला पोहोचायला होणारा उशीर याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अभिनेता शशांक केतकरही अनेक सामाजिक विषयांवर व्हीडीओ व पोस्ट शेअर करत आपली मते मांडत असतो.
शशांकने काही दिवसांपूर्वीच रस्त्यावर कचऱ्याचा ढीग साचल्याचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला होता. आता अभिनेत्याने मीरा-भाईंदर परिसरातील एका रस्त्यावरचे खड्डे पाहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. शशांक व्हीडीओ शेअर करत सांगतो, “नमस्कार, जय महाराष्ट्र! मी पोस्ट केलेले फोटो आणि व्हीडीओ तुम्ही पाहिले असणार याची मला खात्री आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने ही पोस्ट मुद्दाम शेअर करावीशी वाटली.
आपल्या राज्यात सुरू असलेले एकंदर निर्लज्ज राजकारण, त्यांच्यावरचे प्रेशर वगैरे या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण, हे प्रेशर हँडल करून ते मार्ग काढू शकतात त्यामुळेच त्या मोठ्या हुद्द्यावर ही सगळी मोठी मंडळी बसलेली आहेत. हा प्रश्न एका चौकाचा नसून महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गावांचा, शहरांचा आणि देशातील प्रत्येक रस्त्याचा हा प्रश्न आहे. या फोटोंमध्ये रस्त्याची जी काही अवस्था झालीये… ती पाहून मला राग आला, शरम वाटली. मला असे वाटले की, ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो पुतळा लाल फडक्यामध्ये गुंडाळलेला आहे. त्या पुतळ्याचे अद्याप अनावरण झालेलं नाही.
त्याचे अनावरण करण्यासाठी कोणत्या राजकारण्याची चिठ्ठी निघणार याची स्पर्धा चालू असेल. पण, या पुतळ्याच्या आजूबाजूच्या रस्त्याची अवस्था अशीच आहे. कोणत्याच शिवभक्ताला या रस्त्यामुळे अपघात झालेले बघवणार नाही.