संग्रहित छायाचित्र
मागील काही दिवसांपासून सलमान खानचे (Salman Khan) काळवीट शिकार प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. १९९८ मध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाचे शूटिंग करत असताना राजस्थानमधील एका गावात सलमान खानने काळविटाची शिकार केल्याचा आरोप केला जातो. त्यावेळी त्याच्यासोबत अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे हे देखील होते. या आरोपानंतर सलमान खान कायद्याच्या पेचात अडकला. या संदर्भात सलमानने त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. २००९ ला दिलेल्या अशाच एका मुलाखतीत त्याने काळविटांच्या कळपासमोर गेल्याचे कबूल केले.
सलमान म्हणाला, मला वाटतं हे सगळं त्याच वेळेस सुरू झालं. एके दिवशी पॅकअप झाल्यावर आम्ही सगळे कारमधून प्रवास करत होतो. माझ्यासोबत सैफ अली खान, तब्बू, नीलम कोठारी, अमृता, सोनाली हे सर्वजण होते. त्याचवेळी आम्हाला हरणाचं एक पिल्लू एका झुडुपात अडकल्याचं दिसलं. त्या ठिकाणी हरणांचा पूर्ण कळप होता. मी कार थांबवली. झुडुपात अडकलेलं ते पिल्लू खूपच घाबरेलेलं होतं. आम्ही त्याला झुडुपातून बाहेर काढलं. त्याला पाणी पाजलं. ते पिलू खूपच घाबरलेलं होतं. थोड्या वेळाने आम्ही त्याला बिस्किट खाऊ घातलं. त्यानंतर ते पिलू तिथून निघून गेलं. लवकर पॅकअप झाल्याने आम्ही सगळे सोबत होतो. मला असं वाटतंय या प्रकरणाची सुरुवात तिथूनच झाली असावी.
या सगळ्या प्रकाराबाबत सलमान खानचे वडील सलीम खान यांनी देखील नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. सलीम खान म्हणाले, सलमानने कोणत्याही प्राण्याची शिकार केलेली नाही. शिकरीच्या वेळी तो तिथे नव्हता. तो माझ्याशी खोटं बोलणार नाही. त्याला प्राण्यांना मारण्याचा छंद नाही. तो प्राणीप्रेमी आहे. त्याने माफी मागितली तर त्याने चूक केली असा त्याचा अर्थ होईल. आम्ही अगदी झुरळाला देखील मारलं नाहीये. आमचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही.