सलीम-जावेद यांची जोडी तुटली पण दोस्ती कायम!

सलीम-जावेद या जोडीने बाॅलिवूडमधील सुवर्णकाळ अनुभवला आहे. ‘शोले,’ ‘दीवार,’ ‘जंजीर’ यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांसाठी संवाद लिहिणाऱ्या या जोडीने एकूण २४ चित्रपट लिहिले होते, त्यापैकी २२ ब्लॉकबस्टर ठरले. मात्र, एक वेळ अशी आली जेव्हा ही ब्लॉकबस्टर जोडी अचानक तुटली. असे असले तरी, त्यांची मैत्री मात्र अद्यापही कायम आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 22 Aug 2024
  • 11:11 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सलीम-जावेद या जोडीने बाॅलिवूडमधील सुवर्णकाळ अनुभवला आहे. ‘शोले,’ ‘दीवार,’ ‘जंजीर’ यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांसाठी संवाद लिहिणाऱ्या या जोडीने एकूण २४ चित्रपट लिहिले होते, त्यापैकी २२ ब्लॉकबस्टर ठरले. मात्र, एक वेळ अशी आली जेव्हा ही ब्लॉकबस्टर जोडी अचानक तुटली. असे असले तरी, त्यांची मैत्री मात्र अद्यापही कायम आहे.

या जोडीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा यामुळे दोघांच्या कुटुंबीयांसह बाॅलिवूडलाही मोठा धक्का बसला होता.  अलीकडेच, सलीम-जावेद या लेखक जोडीवर आधारित ‘अँग्री यंग मॅन’ हा माहितीपट अमेझॉन प्राइमवर प्रसारित करण्यात आला आहे, ज्यामध्ये सलमान खानने सांगितले की जावेद साहब यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलीम साहब अस्वस्थ झाले होते.

नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सलमानने सलीम-जावेद जोडीच्या ब्रेकअपवर वडील सलीम यांची पहिली प्रतिक्रिया सांगितली आहे. सलमानने सांगितले की, ज्या दिवशी ही जोडी तुटली, जेव्हा त्याचे वडील सलीम साहब घरी आले. तेव्हा ते खूप अस्वस्थ होते. सलमान डायनिंग टेबलवर बसला होता. सलीम साहब आले आणि म्हणाले, ‘जावेद आणि माझी भागीदारी...’ हे बोलून सलीम साहब शांत झाले. मग म्हणाले, ‘त्यांना वेगळे व्हायचे आहे.’ सलमानने त्यांना विचारले, का? तुम्ही काहीच बोलला नाहीत? यावर सलीम साहेबांनी नकार दिला. सलमान यांनी पुन्हा विचारले, काहीतरी कारण असावे. तर प्रत्युत्तरात ते म्हणाले, ‘त्यांना जायचे असेल तर ते जातीलच.’ एवढं बोलून सलीमसाहब शांत झाले.

जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नी हनी इराणी यांनीही या जोडप्याच्या ब्रेकअपवर जावेद साहब यांची प्रतिक्रिया माहितीपटाच्या एका भागात सांगितली. एक दिवस जावेद साहब घरी आले आणि म्हणाले, ‘तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे.’ जावेद साहेबांनी पुन्हा गाडीला धडक दिल्याचे हनी इराणींना वाटले. यासंदर्भात त्यांनी विचारले असता जावेद साहब म्हणाले, ‘नाही, मी सलीम साहेबांपासून वेगळा झालो आहे.’ हनी इराणी यांना याचे कारण जाणून घ्यायचे असताना जावेद साहब म्हणाले, ‘हा प्रश्न मला पुन्हा विचारू नका.’

सलीम-जावेद जोडीने लिहिलेल्या ‘जंजीर’ या चित्रपटाने अमिताभ बच्चन स्टार बनले. वर्षांनंतर याच जोडीने अमिताभ बच्चन यांना ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात काम करण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. अमिताभ म्हणाले होते, ‘‘मी हिरो आहे, लोक मला पाहायला येतात, माझा आवाज ऐकायला कोण येणार?’’

साहजिकच ‘मिस्टर इंडिया’ ही संकल्पना ८०च्या दशकात खूपच विचित्र होती. तोपर्यंत काही काल्पनिक चित्रपट बनले होते आणि बहुतेक फ्लॉप होते. अमिताभ यांनी नकार दिल्याने सलीम-जावेद चांगलेच संतापले. जावेद यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत यापुढे काम करणार नाही असा निर्णय घेतला, मात्र सलीम साहब या निर्णयावर खूश नव्हते.

काही दिवसांनंतर जावेद साहब अमिताभ बच्चन यांच्या घरी आयोजित होळी पार्टीत पोहोचले आणि त्यांना सांगितले की, सलीम खान यांना कधीही त्यांच्यासोबत काम करायचे नाही. या गैरसमजामुळे या जोडीचे वर्किंग रिलेशनशिप बिघडले आणि दोघांनी पुन्हा एकत्र काम केले नाही. १९८२मध्ये या हिट जोडीचे ब्रेकअप झाले, तरीही त्यांची मैत्री अजूनही कायम आहे.  

सिनेपत्रकार अनिता पाध्ये यांनी सलीम-जावेदच्या ब्रेकअपची कथा त्यांच्या 'यही हैं रंगरूप' या मराठी पुस्तकात लिहिली आहे. यामध्ये सलीम यांनी मात्र आपली जोडी तुटण्याला अमिताभ यांना जबाबदार ठरवल्याचा उल्लेख आहे. एक अमिताभ सोडले तर फिल्मी दुनियेत माझे कुणाशीही शत्रुत्व नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सुनावले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story