संग्रहित छायाचित्र
नागराज मंजुळे यांचा 'फँड्री' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. चित्रपटातील नवखे कलाकार सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात ज्यांनी साकारलेल्या 'जब्या' आणि 'शालू'च्या भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटातील गाणी देखील प्रचंड लोकप्रिय झाली होती. फँड्री चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील रेकॉर्ड ब्रेक कमी केली होती.
या चित्रपटात काम करणारे दोन्हीही कलाकार सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात हे आता मोठे झाले आहेत. हे दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. खरंतर त्यांच्या खऱ्या नावांपेक्षा ते चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकांच्या नावानेच जास्त प्रसिद्ध आहेत.
नुकताच राजेश्वरी खरात हिने आपले इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती सोमनाथसोबत लग्नमंडपात बसल्याचे दिसत आहे. दोघांनीही डोक्याला मुंडावळ्या बांधल्या आहेत. हा फोटो राजेश्वरीने सोमनाथच्या इंस्टाग्राम अकाउंटसोबत कोलॅब केला आहे. या फोटोमुळे या दोघांनी गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
राजेश्वरी आणि सोमनाथ हे अधूनमधून इंस्टाग्रामवर एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. अनेक वेळा लोक त्यांना तुम्ही दोघं लग्न करा असे सल्ले देतात. मात्र राजेश्वरी आणि सोमनाथने थेट लग्न मंडपातलेच फोटो इंस्टाग्रामवर शेअर केल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. या फोटो सोबतच राजेश्वरीने 'सर सुखाची श्रावणी...' हे गाणं लावलं आहे. या फोटोमध्ये राजेश्वरीने पिवळी साडी नेसली असून तिच्या डोक्यावर पदर आहे. तिच्या कपाळाला मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. तर तिने हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा घातला आहे. तर सोमनाथने पांढरा सादरा घालून डोक्यावर टोपी आणि कपाळाला मुंडावळ्या बांधल्या आहेत. तसेच या फोटोला कोणतेही कॅप्शन देण्यात आलेले नाही. त्यामुळे या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, त्या दोघांचं खरंच लग्न झालं आहे की एखाद्या नव्या प्रोजेक्टसाठी ते लोकांची फिरकी घेत आहे हे अजून समोर आलेले नाही.
तसेच नेटकऱ्यांनी या फोटोवर कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'काळ्या चिमणीची राख सापडली वाटतं जब्याला', 'भाऊ चिमुट चिमूटभर राख भेटेल का मला पण', 'खूप नशीबवान आहात की पहिलं प्रेम मिळवलं', 'झालं बाबा एकदाच फॅन्ड्री पिक्चर बघितलेले पैसे फिटले आज', 'शालू शेवटी जबाब्याचीच', 'जब्यानं शालू वर काळ्या चिमणीची राख टाकली रे भौ', 'जब्याने बाजी मारली' यासारख्या गमतीशीर कॉमेंट्स या फोटोखाली आल्या आहेत. दरम्यान, राजेश्वरी आणि सोमनाथ खरोखरच लग्न बंधनात अडकले आहेत की ही एखाद्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यासाठी केलेली युक्ती आहे याचा अजून उलगडा झालेला नाही.