मासिक पाळी...मोकळेपणाने बोलण्याचा विषय

मासिक पाळी... महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि त्या बदलांचा कमीजास्त प्रमाणात महिलांच्याच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी हल्ली मोकळेपणाने बोलले जाते.  काळ बदलला त्याप्रमाणे मासिक पाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 17 Jul 2024
  • 03:23 pm
Entertainment news, Menstruation,  physical and mental health, attitude towards menstruation,  female body

संग्रहित छायाचित्र

मासिक पाळी... महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि त्या बदलांचा कमीजास्त प्रमाणात महिलांच्याच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी हल्ली मोकळेपणाने बोलले जाते.  काळ बदलला त्याप्रमाणे मासिक पाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. पण, जेव्हा हा काळ बदलत होता त्यादरम्यान नेमकी काय स्थिती होती. जेव्हा सॅनिटरी पॅड ही संकल्पना अस्तित्वात आणि भारतात वापरात आली तेव्हा काय स्थिती होती, या साऱ्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मनमोकळा संवाद साधला आहे.  वयाच्या  १० व्या वर्षी मला मासिक पाळी आली होती,  असे सांगताना त्यांनी आता आपण ५८ वर्षांचे असल्यामुळे  जवळपास संपूर्ण आयुष्यच या मासिक पाळीसोबत व्यतीत केल्याचे सांगितले.

शारीरिकदृष्ट्या मी फार कमी वेळासाठी बालपण अनुभवले. ते वयच असे असते जेव्हा तुम्ही बौद्धिकदृष्ट्या तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी सजग नसता. सुदैवाने माझ्या आईने एका आकृतीच्या माध्यमातून मला ही गोष्ट समजावून सांगितली होती. मी नशीबवान होते कारण या साऱ्याची चर्चा माझ्या घरी अगदी मोकळेपणाने होत होती. पण, नेमके काय आणि का घडत आहे हे मलाच कळत नव्हते.  फक्त इतके माहीत होते , की हे जे काही घडत आहे ते वाईट नाही आणि मला त्याचा त्रास होत नाही. मला याची खात्री पटवून देण्यात आली होती', खरेतर हा मोकळेपणाने बोलण्याचा विषय आहे, असे रेणुका शहाणे यांनी सांगितले. 

आपल्या शाळेत, वर्गात कोणालाही पाळी आली नव्हती असे सांगताना त्यांनी पाळी येत असताना त्यादरम्यान मनातले बोलण्यासाठी सोबत कोणी नव्हते,  या भावनेनेच एकाकीपणा येऊ लागलेला असे सांगितले. या साऱ्यामध्ये आपल्याला आईची साथ मिळाली असे सांगताना रेणुका शहाणे यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आपल्यावर मानसिक परिणाम झाल्याची बाब नाकारली नाही. कमी वयात पाळी आल्यामुळे  मी त्या वयात कोणाही मैत्रिणीशी त्याविषयी बोलू शकले नाही, मला माझ्या शरीरात होणारा हा बदल लपवून ठेवावा लागला आणि हीच गोष्ट पुढेही माझ्या जीवनात कायम राहिली. कारण, मी कायमच कशी दिसते, कशी पेहराव करते, माझा शरीराकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे याबाबत सतत विचार करत असते, काहीशी संकोचलेली असते असेही त्या म्हणाल्या. महिलांसह समाजामध्येच मासिक पाळी, समाजामध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story