'मुंज्या' चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी !

बॉलिवूड चित्रपटांमध्ये सध्या नवनवीन प्रयोग होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता लवकरच एक नवीन हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे ‘मुंज्या’ असे नाव आहे. मराठमोळ्या आदित्य सरपोतदारने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. नुकताच या हॉरर चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 27 May 2024
  • 12:46 pm
 Bollywood movie

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूड चित्रपटांमध्ये सध्या नवनवीन प्रयोग होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता लवकरच एक नवीन हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे ‘मुंज्या’ असे नाव आहे. मराठमोळ्या आदित्य सरपोतदारने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. नुकताच या हॉरर चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘मुंज्या’ चित्रपटाच्या एकूण २.१८ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सगळेच कलाकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. मुंज्या आणि मुन्नीमध्ये नेमके काय कनेक्शन आहे? मुन्नीच्या प्रेमात वेडा झालेल्या मुंज्याची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा कशी अपूर्ण राहते. लग्नाआधी झालेला मृत्यू, शापित झाड या सगळ्याची झलक प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. परंतु, या सगळ्यात आणखी एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती गोष्ट म्हणजे चित्रपटात झळकणारे मराठी कलाकार…’मुंज्या’मध्ये एक दोन नव्हे तर मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर ‘मुंज्या’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये तिची झलक पाहायला मिळत आहे. आजवर विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिकाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता ती बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या हास्यजत्रेचे कलाकार तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.  रसिका वेंगुर्लेकरशिवाय मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, अजय पूरकर, बालकलाकार खुशी हजारे, शर्वरी वाघ असे बरेच मराठी कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. दरम्यान, ‘मुंज्या’ चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने केले असून या सिनेमात मोना सिंह, अभय वर्मा यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘स्त्री’ चित्रपटाचे मेकर्स मॅडॉक फिल्म्सकडून ‘मुंज्या’ सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या ७ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक आगळी-वेगळी कलाकृती रुपेरी पडद्यावर येणार म्हणून सध्या प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story