संग्रहित छायाचित्र
‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये भाऊच्या धक्क्यावर दर आठवड्यात विविध ट्विस्ट येतात. यंदा ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री कंगना रणौत व अभिनेता श्रेयस तळपदेने ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर खास उपस्थिती लावली आहे. रितेश देशमुखने मोठ्या उत्साहात या दोघांचे स्वागत केले.
श्रेयस आणि कंगना यांची जोडी भाऊच्या धक्क्यावर येणार, मग कल्ला तर जोरदार होणार, असे कॅप्शन देत ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यावेळी कंगना तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची माहिती प्रेक्षकांना देत असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. कंगना व श्रेयस येताच घरातील सदस्यांना काही हटके टास्क देण्यात आले होते. फुग्यातील हवा इन्हेल करून स्पर्धकांना कार्डवर लिहिलेला संदेश म्हणून दाखवायचा होता. यावेळी अभिजीतला त्याचे आयकॉनिक ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ हे गाणे गायला सांगितले होते. तर, निक्की तिचा ‘बिग बॉस’च्या घरातील “बाईईई” हा डायलॉग म्हणून दाखवत होती. फुग्यातील हवा घेऊन हे डायलॉग म्हणून दाखवल्यामुळे सदस्यांचा आवाज नेहमीपेक्षा काहीसा वेगळा येत होता. त्यांचे वेगळे आवाज ऐकून घरात एकच हास्यकल्लोळ झाल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
कंगनाने ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर एन्ट्री घेताच 'राम राम मंडळी' म्हटले. मराठी भाषेतून संवाद साधत नमस्कार केल्याने कंगनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.