संग्रहित छायाचित्र
झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मालिकेतील पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटत होती. या मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या मालिकेतील युवराज देशमुख अर्थात भैय्यासाहेब देशमुख हे पात्रही प्रेक्षकांना आवडायचे. अभिनेता किरण गायकवाड याने हे भैय्यासाहेब देशमुख पात्र साकारले होते. याच मालिकेच्या वेळच्या आठवणी किरणने शेअर केल्या आहेत. एका मुलाखतीदरम्यान किरण गायकवाडने या मालिकेच्या वेळची आठवण सांगितली आहे. ‘देवमाणूस’ मालिकेवेळी आई प्रचंड रडली होती, असे किरण म्हणाला.
माझी आई धुण्याभांड्याची कामे करायची. अगदी ‘लागीर झालं जी’ मालिकेपर्यंत ती ते काम करत होती. पण मग मी तिला सांगितले की आता नको करूस. मग आईने ते काम बंद केले. ‘देवमाणूस’ ही मालिका सुरू होती. या मालिकेत व्हिलनचे कॅरेक्टर मी करत होतो. या पात्रावर लोकांनी प्रेमही केले. तर काहींना ते पात्र नाही आवडायचे. तेव्हा लोक येऊन आईला सांगायचे की कसा आहे तो लोकांना किती त्रास देतो वगैरे… त्यावेळी आई खूप रडली होती. त्याचे मलाही खूप वाईट वाटले होते. आजही त्या गोष्टीचं वाईट वाटते, किरणने सांगितले.
आईला मी कधीच कुठल्या सेटवर नेत नाही. मी ठरवले आहे की जेव्हा मी पॉझिटिव्ह कॅरेक्टर करेन तेव्हा आईला मी सेटवर नेईन. निगेटिव्ह काम करत असताना मला तिला न्यायचे नाही सेटवर. 'डंका' सिनेमाचे शुटिंग रात्री झाले. त्यामुळे तिला नेले नव्हते. पण मला आईचा खूप जास्त सपोर्ट आहे. मला फोनवर बोलायला फारसे आवडत नाही. हे आईला माहिती आहे. त्यामुळे ती मला फक्त कधी येणार आहेस? जेवणार आहेस का? एवढेच विचारायला फोन करते. बाकी आम्ही घरी असताना एकमेकांशी बोलतो, असे किरण गायकवाडने सांगितले.