संग्रहित छायाचित्र
अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वरा म्हणाली, माझ्यासाठी ट्विटर हे प्लॅटफॉर्म अत्यंत महागडे पडले आहे. कारण त्याचा मोठा परिणाम माझ्या करिअरवर झाला. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर स्वरा तिची स्पष्ट मते मांडत आली आहे. मात्र आपले मोकळे विचार मांडणाऱ्या स्वराला चित्रपटाची ऑफर दिली तर काहीतरी वाद होईलच, या भीतीने निर्मात्यांनी तिला ऑफर्स देणे बंद केल्याचे तिने म्हटले आहे.
माझ्या जवळच्या व्यक्तींना वाटते की मीच माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि माझे करिअर उद्ध्वस्त करून घेतले. एका मुलाखतीत स्वरा याविषयी पुढे म्हणाली, “या जगात जर अशी एखादी गोष्ट असेल ती मला सर्वांत महागात पडली असेल, ती म्हणजे माझे ट्विटर अकाऊंट. कारण त्यामुळेच माझ्या करिअरवर मोठा परिणाम झाला. बऱ्याच निर्मात्यांसाठी मी इंडस्ट्रीत अस्पृश्य आहे आणि हे माझे शब्द नाहीत. हे माझ्या शुभ-चिंतकांचे, निर्मात्यांचे आणि दिग्दर्शकांचे शब्द आहेत, ज्यांनी मला कॉल करून असे सांगितले. लोक मला म्हणतात की, त्यांना मला भूमिकेची ऑफर द्यायची आहे, पण स्टुडिओकडून माझे नाव ऐकल्यानंतर नकार देण्यात येतो.
माझ्यामुळे काहीतरी वाद निर्माण होईल अशी निर्मात्यांना भीती आहे. ही कसली भीती मला माहीत नाही पण ही भीती त्यांच्यात आहे. मला रस्त्यावर, एअरपोर्टवर अनेक लोक भेटतात आणि माझ्यामुळे त्यांना धैर्य मिळत असल्याचे सांगतात. हे ऐकून मला खूप बरे वाटते. पण माझ्याच शुभचिंतकांना असे वाटते की, मी माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. असे बरेच लोक माझ्या आयुष्यात आहेत, जे मला म्हणतात की मी चुकीचे केले. मी माझे करिअर उद्ध्वस्त केले. ते मला विचारतात की मी असे का केले? माझा भाऊ नेहमीच माझ्या पाठिशी उभा असतो. पण तोसुद्धा या कारणामुळे माझ्यावर चिडतो आणि म्हणतो की, तुझ्यासारख्या उत्तम अभिनेत्रीने स्वत: पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस, अशा शब्दांत स्वराने नाराजी बोलून दाखवली.