ट्रोलिंगमुळे चिन्मय मांडलेकर नाराज; अभिनेता म्हणाला, छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो

अभिनेता चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाच्या 'जहांगीर' या नावामुळे सध्या ट्रोल केले जात आहे. आता याबाबत चिन्मयने नुकताच एक व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संग्रहित छायाचित्र

अभिनेता चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाच्या 'जहांगीर' या नावामुळे सध्या ट्रोल केले जात आहे. आता याबाबत चिन्मयने नुकताच एक व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हीडीओ शेअर करून चिन्मयने मुलाच्या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल आणि त्यामुळे त्याने घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितले आहे. चिन्मयने व्हीडीओ शेअर करून या पुढे छत्रपती शिवरायांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

चिन्मय म्हणाला, "नमस्कार, माझे नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायाने मी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्मातादेखील आहे. काल माझी पत्नी नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हीडीओ शेअर केला होता. तो  माझ्या मुलाच्या जहांगीर या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलचा आहे. माझ्या कुटुंबाबद्दल अतिशय घाणेरड्या आणि अश्लाघ्य कमेंट्स पास केल्या जात आहेत. माझ्या पत्नीने व्हीडीओ पोस्ट केल्यानंतर देखील लोक कमेंट्स करत आहेत. आता लोक मुलाच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत. एक व्यक्ती म्हणून मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे.

मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर सोशल मीडियावरून होत असेल तर त्याच्याशी मी बांधील नाही. माझ्या कामावरून मला वाटेल ते बोलू शकता, तुम्हाला ते आवडले, नाही आवडले पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे, असे मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचे नाव जहांगीर का ठेवले?  यावर मी आधीही बऱ्याच मुलाखतींमध्ये बोललो आहे. माझ्या पत्नीनेही व्हीडीओमध्ये याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे हे मी ते बोलून वेळ वाया घालवत नाही. मी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारतो. आतापर्यंत सहा सिनेमांमध्ये मी ही भूमिका केली आहे, तरीही माझ्या मुलाचे नाव जहांगीर का आहे? हा ट्रोलर्सचा प्रमुख सूर आहे, असेही चिन्मय म्हणाला.

माझ्या मुलाचा जन्म २०१३ साली झाला आज तो ११ वर्षांचा आहे. हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झाले ते आता होत आहे. मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिले. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लाखो लोकांचे प्रेम दिले. फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचेही प्रेम दिले. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशाप्रकारे त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रपणे सांगतो की, इथून पुढे मी ही भूमिका साकारणार नाही. कारण मी करत असलेले काम, मी केलेली भूमिका, या गोष्टींचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर वडील, नवरा, कुटुंब प्रमुख म्हणून मला माझे कुटुंब जपणे खूप महत्त्वाचे आहे. मला याचे खूप वाईट वाटत आहे, कारण माझ्या मनात महाराजांबद्दल जी भक्ती किंवा श्रद्धा आहे तेच मी भूमिकेतून मांडले.  माझ्या गाडीमध्ये देखील जिथे लोक गणपतीची मूर्ती ठेवतात तिथे महाराजांची मूर्ती आहे. हा दिखावा नाही, प्रेम आहे आणि श्रद्धा आहे. मी या गोष्टीचे स्पष्टीकरण  देणार नाही.

नाव खटकते म्हणून जहांगीर आर्ट गॅलरीचे नाव बदलणार का? जहांगीर नावाच्याच एका माणसाला आपल्या देशाने भारतरत्न दिले. भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (जेआरडी टाटा)" असेही चिन्मयने व्हीडीओमध्ये सांगितले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story