संग्रहित छायाचित्र
'ऑफिस ऑफिस' मधून स्वत: ची ओळख मिळवणारा अभिनेता म्हणजे मनोज पाहवा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या नव्या प्रोजेक्टचे नाव 'आईसी 814: द कंधार हायजॅक' असे आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोजने हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मेहनती कलाकारांच्या गोष्टी सांगितल्या आहेत. मनोजने अक्षय कुमारसोबत 'सिंग इज किंग' चित्रपटात काम केले होते. या कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा अनुभव सांगताना मनोज यांनी सांगितलं की ऑस्ट्रेलियामध्ये एक महिनाभर शूटिंग सुरु होती आणि ते रोज पार्टी करायचे. मनोज आणि चित्रपटातील इतर कलाकारांसोबत अक्षय कुमार देखील तिथे उपस्थित असायचा.
सगळे लोक मज्जा करत होते. पण अक्षय कुमार रात्री ९ वाजता झोपायला जायचा आणि इतकेच नाही तर तो दारूही प्यायचा नाही. आठच्या आधी त्याचा ट्रेनर त्याला जेवण तयार आहे याची बातमी द्यायचा. सकाळी, जेव्हा चार वाजायचे तेव्हा अक्षय कुमार दोन-तीन तास वर्कआऊट करायचा. अक्षय खूप मेहनती कलाकार असल्याचे मनोजने सांगितले. मनोज पाहवाने त्याच्या करियरमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या काही चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर त्याने 'मुल्क', 'शादी में जरूर आना', 'वॉन्टेड', 'टोटल धमाल', 'अनेक', 'डरना जरूरी है', 'वन टू थ्री', 'डेढ इश्किया', 'धमाल' आणि 'जॉली एलएलबी' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.