संग्रहित छायाचित्र
बंदुकीतून चुकून गोळी झाडली गेल्याने अभिनेता गोविंदा जखमी झाला. त्याच्या डाव्या पायात गोळी घुसली. त्यानंतर गोविंदाच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं जात आहे.
गोविंदाच्या प्रकृतीची काळजी चाहत्यांना सतावत असताना गोविंदाला मात्र एका वेगळ्याच चिंतेनं त्रस्त केलं आहे. पायावरील शस्त्रक्रिया झाल्यावर गोविंदाने यापुढे तो डान्स करू शकतो का? असा प्रश्न डॉक्टरांना केला. याबद्दलची माहिती गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी प्रसारमाध्यमांना दिली
बॉलीवुड अभिनेता गोविंदा स्वतःच्याच बंदुकीमधून चुकून गोळी झाडली गेल्याने जखमी झाला. रिवॉल्वर स्वच्छ करीत असताना त्याच्याकडून चुकून गोळी झाडली गेली. ही गोळी त्याच्या गुडघ्यात घुसली. मंगळवारी (1 ऑक्टोबर) पहाटे पावणेपाचच्या सुमारास घडली. त्याला मुंबईतल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पायाची शस्त्रक्रिया झाली असून त्याची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, गोविंदाचे मॅनेंजर शशी सिन्हा यांनी माध्यमांना सांगितलं की, शस्त्रक्रिया झाल्यावर डॉक्टर बाहेर आले. त्यांनी गोविंदा पूर्ण बरा असल्याचं सांगितलं. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की गोविंदाने यांना एक प्रश्न केला आहे. मला पुढच्या आयुष्यात नाचता येईल का? असा प्रश्न गोविंदाने केला. त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू आले, असं सिन्हा म्हणाले.