File Photo
हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम अभिनेता निविन पॉली याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला. एका ४० वर्षीय महिलेने केरळमधील एर्नाकुलम येथील ओन्नुकल पोलीस ठाण्यात निविनसह सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये श्रेया नावाच्या महिलेचाही समावेश आहे. याशिवाय एके सुनील, बिनू, बशीर, कुट्टन आणि निविन पॉली अशी निर्मात्यांची नावे आहेत. निविन हा या प्रकरणातील सहावा आरोपी आहे. या अभिनेत्याने दुबईत आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. दुसरीकडे, निविनने हे आरोप पूर्णपणे निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तक्रारदार महिला पहिल्यांदाच आरोपी श्रेयाच्या संपर्कात आली होती. श्रेयाने महिलेला युरोपमध्ये केअरगिव्हर म्हणून नोकरीची ऑफर दिली होती. महिलेने काम केले नाही तेव्हा श्रेयाने तिच्याकडे पैसे परत मागितले. काही दिवसांनी आरोपी श्रेयाने महिलेला चित्रपटाची ऑफर दिली. यावेळी त्यांना अंमली पदार्थ देऊन नंतर त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले. महिलेचे म्हणणे आहे की, सहा आरोपींनी वेगवेगळ्या प्रसंगी तिच्यासोबत काही ना काही कृत्य केले आहे. ही सर्व प्रकरणे दुबईत नोव्हेंबर २०२३ मध्ये घडली.
या प्रकरणाबाबत अभिनेता निविनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक निवेदन जारी केले आहे. तो म्हणाला, ‘‘माझ्याबद्दल एक खोटी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये माझ्यावर शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे संपूर्ण खोटे आहे. हे आरोप निराधार सिद्ध करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.’’ यानंतर निविनने पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी कायदेशीर कारवाई करून तक्रारदारावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.