संग्रहित छायाचित्र
मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला वेगळे स्थान प्राप्त झाले. ज्यांच्यामुळे अभिनयाची एक वेगळी उंची गाठली गेली, अशा अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अशोक सराफ. ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र अशोक मामा म्हणून ओळखतो, ते ‘लाईफ लाईन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जुने चित्रपट आणि नवे चित्रपट यांच्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
कॅमेरे लेन्सेस जास्त आल्यामुळे शॉट घेण्याचे प्रकार वाढले. जुन्या चित्रपटांमध्ये साधे टेक्निक होते, पण ते लोकांना आवडायचे. कारण कथेमध्ये जोर असायचा. कथानक इतक्या ताकदीचे असायचे की लोक त्यामध्ये गुंतून जायचे. लोकांना तुम्ही कोणता अँगल घेतला आहे, त्याने फरक पडत नाही; तर चित्रपटात काय घडते याने फरक पडतो. ते आवडले तर चित्रपट चालतो. त्यावेळच्या चित्रपटांचे रौप्य महोत्सव साजरे व्हायचे, आता चार आठवडे चित्रपट टिकणे कठीण झाले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
अभिनय क्षेत्रात येणाऱ्या नवीन कलाकारांना तुम्ही काय सल्ला द्याल, याला उत्तर देताना अशोक सराफ यांनी म्हटले आहे की, मी सांगावे असे काही नाही आणि मी सांगेन ते पुढचे लोक ऐकतील, असेही नाही. कारण जो माणूस या क्षेत्रात येतो, त्याला स्वत:ची पद्धत असते, धारणा असते. आपण करत असलेल्या कामाबद्दल कल्पना असते. काम करताना प्रत्येक व्यक्तीने आपण करत असलेल्या कामाबद्दल विचार केला पाहिजे. एका चित्रपटानंतर हे जमणार नाही, मात्र थोडंफार काम केल्यानंतर याचा अभ्यास केला पाहिजे. कॅमेरा अशी गोष्ट आहे, जी कुठे ठेवल्यावर तुम्ही कसे दिसणार आहात याचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे. हे लक्षपूर्वक काम करण्यातून येते, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ‘लाईफ लाईन’ हा चित्रपट २ ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल झाला असून अशोक सराफ एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलरमध्ये त्यांनी निभावलेली सर्जनची भूमिका अत्यंत गंभीर असलेली पाहायला मिळत आहे. हा चित्रपट साहिल शिरवईकर यांनी दिग्दर्शित केला असून माधव अभ्यंकर हे किरवंताच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.