आता ते भोगताहेत शिक्षा

अभिनेता अनिकेत विश्वासरावने मराठी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयकौशल्याची विशेष छाप सोडली आहे. अनिकेत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 19 Jul 2024
  • 04:26 pm

संग्रहित छायाचित्र

अभिनेता अनिकेत विश्वासरावने मराठी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयकौशल्याची विशेष छाप सोडली आहे. अनिकेत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला होता. काही वर्षांपूर्वी त्याने स्नेहा चव्हाणशी लग्न केले होते.  मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच ते विभक्त झाले. स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिकेत याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

“ज्या लोकांनी माझ्यासोबत चुकीच्या गोष्टी केल्या आहेत, ते आता भोगत आहेत. मला त्या सगळ्या गोष्टींचा मानसिक त्रास झाला, पण जे झाले ते चांगल्यासाठीच झाले. मला वकिलाच्या रूपात एक चांगला मित्र भेटला. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, असे नेहमी म्हटले जाते. पण मी म्हणतो कोर्टात जायचे. बिनधास्त जायचे. तुम्हाला न्याय मिळेल. आपली न्यायव्यवस्था खूप चांगली आहे, असे त्याने पुढे सांगितले. २०२१ मध्ये स्नेहा चव्हाणने अनिकेत विश्वासरावसह त्याची आई आणि वडिलांविरोधात पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या तिघांवर तिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीचा आरोप केला होता. ‘अनिकेत विश्वासराव याने १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षांच्या काळात सिनेमासृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल, या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. इतकेच नव्हे तर गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला,’ असे स्नेहाने तिच्या तक्रारीत म्हटले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story