भाजपचे मंत्री पैसे वाटतानाचे व्हीडीओ माझ्याकडे : नाना पटोले
#रायपूर
कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे मंत्री पोलीस संरक्षणात मतदारांना पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप करून या संदर्भातील व्हीडीओ आपल्याकडे असल्याचा दावा करीत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली.
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे कॉंग्रेसचे महाअधिवेशन सुरू आहे. त्यासाठी पटोले सध्या रायपूरमध्ये आहेत. तेथून ‘टीव्ही नाईन मराठी’ या न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गंभीर आरोप केला. पटोले म्हणाले, ‘‘कसबा पेठेत निवडणुकीच्या दरम्यान जो प्रकार घडला आहे त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे, निवडणूक आयोगाने त्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई
केली पाहिजे.’’
कसबा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय निश्चित असल्याचा दावाही पटोले यांनी केला आहे. ‘‘भाजपकडून मतदारांना मोठ्या प्रमाणावर पैसे वाटण्यात येत असल्याने या विरोधात आमचे उमेदवार धंगेकर उपोषणाला बसले होते. मी त्यांना ‘आंदोलन मागे घ्या आणि लोकांमध्ये जा,’ असे सांगितले. लोकांना विकत घेऊन निवडणूक जिंकू, असा समज भाजपने करून घेतला आहे, असे म्हणत मंत्री पोलीस संरक्षणात पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करीत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
या घटनेचे व्हीडीओ आमच्याकडे असल्याचा दावादेखील पटोले यांनी केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणाला फटका बसला हे पाहिलं आहे. या पोटनिवडणुकीतही तेच चित्र असेल, असे म्हणत पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. रायपूर येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनाला जाण्यापूर्वी ते कसबा मतदारसंघात तळ ठोकून होते. कसबा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेसने सर्व ताकद लावली आहे.वृत्तसंंस्था