संग्रहित छायाचित्र
टीसीएस आयओएनच्या अधिकृत केंद्रांवरच परीक्षा घेण्याची उमेदवारांची मागणी, खासगी केंद्रांवरील परीक्षांमध्ये गैरप्रकार घडले होते. अखेर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे परीक्षार्थी उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
नगररचना विभागामार्फत रचना साहाय्यकपदासाठीची परीक्षा २५ ते २७ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली होती. परंतु, ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे नगर रचना विभागामार्फत नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आहे. नगररचना साहाय्यकपदाची आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डामार्फत (आरआरबी) 'एएलपी' ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणीबाबत चर्चा सुरू होती. त्याची दखल घेत अखेर नगररचना विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. या परीक्षेबाबत जाहीर केलेल्या माहितीनुसार नगररचना साहाय्यकपदाची २५ ते २७ डिसेंबरदरम्यान होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
या परीक्षेचे सुधारित तारीख आणि वेळापत्रक कालांतराने जाहीर केले जाणार आहे. परंतु, निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी लघुलेखक या परीक्षा मात्र २६ नोव्हेंबरला घेतल्या जाणार असून, यासाठी प्रवेशपत्रे लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
आरआरबी 'एएलपी' परीक्षेसाठी टीसीएस आयओएनची अधिकृत केंद्रे देण्यात आल्याने रचना साहाय्यकपदाच्या परीक्षेसाठी ही केंद्रे मिळणार नसल्याचे उमेदवारांचे मत होते. ही परीक्षा खासगी संगणक केंद्रांवर आयोजित केली जाण्याची शक्यता होती. खासगी संगणक केंद्रांवर घेतलेल्या परीक्षांमध्ये अनेकदा गैरप्रकार समोर आल्यामुळे, खासगी केंद्रांवर परीक्षा घेण्याला उमेदवारांमधून सातत्याने विरोध केला जात होता. आता त्यांच्या विरोधाची दखल घेतली गेली आहे.
प्रसारमाध्यमांतील वृत्ताची दखल
'टीसीएस आयओएन'च्या अधिकृत केंद्रांवरच परीक्षा घेण्याची उमेदवारांची मागणी, खासगी केंद्रांवरील परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकाराची माहिती प्रसारमाध्यमात आली होती. त्याची दखल घेत अखेर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे हजारो परीक्षार्थी उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.