वाझे, देशमुखांनी केला फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न

मुंबई: तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचे टार्गेट दिल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर चांदिवाल समिती नेमण्यात आली. त्या समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही. अनिल देशमुख यांनीही या अहवालाची मागणी केली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 13 Nov 2024
  • 04:45 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांची माहिती, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अहवाल दडवल्याचा केला दावा

मुंबई: तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचे टार्गेट दिल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर चांदिवाल समिती नेमण्यात आली. त्या समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही. अनिल देशमुख यांनीही या अहवालाची मागणी केली होती. मात्र हा अहवाल समोर आलेला नाही. अशातच निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनी एक मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांनी गुंतवण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट चांदिवाल यांनी केला आहे.

२७ एप्रिल २०२२ ला मी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंकडे अहवाल सोपवला होता. त्यामध्ये ज्या बाबी मांडल्या आहेत त्या कुठल्याही शासनाच्या पचनी पडणाऱ्या नाहीत. त्यामुळे तो माझा अहवाल सार्वजनिक केला गेला नसावा, असे चांदिवाल यांनी म्हटले आहे. मला शासकीय अधिकाऱ्यांनी पाहिजे तशी मदत केली नाही, हे वास्तव असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.  परमबीर सिंग यांना समोर आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. आयोगाच्या चौकशीत अडथळे निर्माण केले गेले. आयोगाला गाडी दिली गेली नाही, स्टाफ दिला गेला नाही. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील जागा दाखवली ती अयोग्य दाखवली. शेवटी एक जागा आम्ही निवडली आणि तिथल्या स्टाफला त्रासही झाला, पण हवी तशी मदत आम्हाला त्यावेळच्या सरकारकडून मिळाली नाही. मी माझी नाराजीही मांडली आहे, उद्धव ठाकरेंना मी हे सांगितले आहे. मी प्रत्यक्ष भेट घेऊनही त्यांना हे सांगितले असल्याचे चांदिवाल यांनी सांगितले.

... म्हणून मी आजवर काही बोललो नाही

अनिल देशमुख, पलांडे, परमबीर सिंग यांना आम्ही दंड भरायला लावला होता. आम्हाला जे शपथपत्र दिले होते  त्या अनुसार सचिन वाझेंनी साक्षीपुरावे दिले असते तर बराच खुलासा झाला असता. त्यांच्या शपथपत्रात त्यांनी दोन राजकीय व्यक्तींची नावे घेतली होती. आर्थिक व्यवहारांचाही उल्लेख केला होता. ती नावे होती अजित पवार आणि शरद पवार. मी त्यांना ही नावे रेकॉर्डवर घेणार नसल्याचे सांगितले.  नियमांत बसत नसल्याने मी ते रेकॉर्डवर घेतले नाही. देवेंद्र फडणवीस हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते त्यांनाही गुंतवण्याचा प्रयत्न सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. प्रकरण कुठले होते ते मी सांगणार नाही, असे चांदिवाल यांनी स्पष्ट केले. मी त्यावेळी हे बोललो नाही कारण चर्चा करण्याला कारण मिळते. राजकीय व्यक्तींना गुंतवून मला स्वतःची प्रसिद्धी नको होती. त्यामुळे मी त्यावेळी काही बोललो नसल्याचे चांदिवाल म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story