नांदेड : भावा-बहिणीतच चुरशीची लढत

कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, शेकापच्या आशा शामसुंदर शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकनाथ पवार, आरक्षणवादी आघाडीचे चंद्रसेन सुरनर व मनोहर धोंडेंसह एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. खरी लढत चिखलीकर आणि आशा शिंदे या भाऊ-बहिणीतच होणार आहे.

Eknath Pawar,Kandahar,Loha, Assembly Constituency, NCP,Pratap Patil Chikhlikar,Asha Shamsunder Shinde,Uddhav Balasaheb Thackeray

संग्रहित छायाचित्र

कंधार-लोहा मतदारसंघात १४ उमेदवार, भाजप सोडून घड्याळ बांधलेल्या चिखलीकरांसाठी अस्तित्वाची लढाई

कंधार : कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, शेकापच्या आशा शामसुंदर शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकनाथ पवार, आरक्षणवादी आघाडीचे चंद्रसेन सुरनर व मनोहर धोंडेंसह एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. खरी लढत चिखलीकर आणि आशा शिंदे या भाऊ-बहिणीतच होणार आहे.

 या मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी व ओबीसी आघाडी यामध्ये जोरदार लढत आहे. कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात मोठी चुरशीची लढत होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीच्या उलट परिस्थिती निर्माण झाली असून मात्र खरी लढत प्रताप पाटील चिखलीकर आणि आशाताई शिंदे या बहीण-भावासह एकनाथ पवार यांच्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ओबीसी नेते चंद्रसेन पाटील सुरनर, मनोहर धोंडे, शिवा नरंगले या तीन उमेदवारांमुळे ओबीसी समाजातील मतदारांचे विभाजन होईल, असेही बोलले जात आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये एकनाथ पवार यांनी भाजपला रामराम ठोकत शिवबंधन बांधले. लोकसभेला पराभूत झालेल्या प्रताप चिखलीकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून विधानसभेत षड्डू ठोकले आहेत. त्यांच्या विरोधात एकनाथ पवार यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा दांडगा जनसंपर्क कोणावर भारी पडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

विद्यमान आमदार शामसुंदर शिंदे व त्यांच्या पत्नी आशाताई शिंदे हे दोघेही पती-पत्नी मतदारसंघात सदैव कार्यरत असल्याने यांना सर्वच स्तरातील मतदार ओळखतात. त्यांच्या मागील कामांचा आढावा घेताना लोक दिसत आहेत. कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात आमदार शिंदे यांनी मागील पंचवार्षिकमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे आणली.

त्यामुळे त्यांच्या कामाची जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे लोहा मतदारसंघ शेकापचा गड राहिला असून मतदारांचा कल स्थानिक उमेदवाराकडे दिसून येत आहे. भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना लोहा विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी कमळ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधून घ्यावे लागले.

साडेतीन दशकांच्या राजकीय जीवनातील चिखलीकर यांचे हे सहावे पक्षांतर आहे. चिखलीकर यांनी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेस प्रतिनिधित्व केले. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कंधार लोहा विधानसभेची वाट धरली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest