संग्रहित छायाचित्र
शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले आहे. यापुढे ते भरावे लागणार नाही. महायुती सरकार अनेक योजना राबवत आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला प्रतिटन ३१५० हमीभाव दिला आहे. शिवाय इंधनामध्ये इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढवून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सिंचन योजनांपासून वंचित ठेवले होते. परंतु राज्यातील महायुतीचे आणि केंद्रातील एनडीए सरकार हे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१२ नोव्हेंबर) संध्याकाळी सोलापुरात दिली.
सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या ११ उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची प्रचार सभा ठेवण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीला लक्ष्य केले. राज्यात महायुतीचे सरकार येण्याची गरज असून त्यासाठी नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले. मोदी पुढे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी पाण्यासाठी सर्वाधिक काळ वंचित ठेवले. आमच्या प्रयत्नामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा जलस्तर उंचावला आहे. आमच्या सरकारने विज बिल माफ केले आहे. शेतकऱ्याला बिल भरायला लागू नये यासाठी शेतकऱ्यांना सोलर यंत्रणा देण्याची योजना आम्ही सुरू केली आहे. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत.
काँग्रेस पक्षाने देशात साठ वर्षे राज्य केले पण समस्या निर्माण करायच्या आणि लोकांना त्या समस्यांमध्ये अडकून ठेवायचे हेच त्यांचे धोरण राहिले आहे. काही प्रकल्प कित्येक दशकांपासून लटकले होते ते महायुती सरकारने पूर्ण केले आहेत. विकसित महाराष्ट्रामुळे आम्ही विकसित भारताकडे वाटचाल करत आहोत. महायुती आहे म्हणून गती आहे आणि महाराष्ट्राची प्रगती आहे, असेही मोदींनी सांगितले.
यावेळी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक, माजी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, शहाजी पवार, आनंद चंदनशिवे, विक्रम देशमुख, संतोष पवार, अमोल शिंदे, किसन जाधव, मनीष काळजे, रंजना चाकते आदी उपस्थित होते. तत्पूर्वी आमदार विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे, सुभाष देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या ११ उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान केले.
सर्वाधिक वेळा सोलापुरात येणारा एकमेव पंतप्रधान
सोलापूरबाबत बोलताना मोदी म्हणाले की, मी असा एकमेव पंतप्रधान आहे, ज्याने सर्वाधिक वेळा सोलापूरला भेट दिली आहे. मला सोलापूरला आल्याशिवाय राहवत नाही. आपल्या ३५ मिनिटांच्या भाषणात मोदी सोलापूरबद्दल भरभरून बोलले. आपल्या भाषणात त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणे कशासाठी योग्य आहे, हे सांगितले. सोलापूरचा सर्वांगीण विकास करण्याचे भाग्य मला लाभले. सोलापूरकरांचे आशीर्वाद माझ्यासाठी ऊर्जा देणारे ठरतात, अशा शब्दांत मोदींनी सोलापूरबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. कार्तिकी एकादशीच्या दिवशी या जिल्ह्यात येण्याचे भाग्य मला लाभले. पंढरपूरची पवित्र धरती आणि विठोबाचे सानिध्य यांचा असा संयोग जुळून आला. आपण पंढरपूरच्या विठुरायाला नमन करतो, संत नामदेव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शतशः नमन करतो, सिद्धेश्वर आणि बसवेश्वरांना नमन करतो, असे मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच नमूद केले.