वरळीत लढा, नाही तर मी ठाण्यातून लढतो
#नाशिक
शिवसेनेचे नेते संजय राऊत असो की माजी मंत्री युवा नेते आदित्य ठाकरे असो, ते नाशिकला येणार म्हटल्यावर शिंदे गटाचे नेते कामाला लागतात आणि ठाकरे गटातील नेते गळाला लावतात. आदित्य यांच्या दुसऱ्या टप्प्यातील शिवसंवाद यात्रेची सभा मंगळवारी नाशिकमध्ये होण्यापूर्वी शिंदे गटाच्या नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत घुसखोरी करून नेते पळवले होते.
मात्र, असे असले तरी आदित्य ठाकरे यांचा आक्रमक बाणा काही कमी झालेला नसून मंगळवारी त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत वरळीतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. ते म्हणाले की, हिंमत असेल तर दोघेही राजीनामा देऊ. एकतर तुम्ही वरळीत येऊन निवडणूक लढा. तुम्हाला हे शक्य नसेल तर माझे डिपॉझिट जप्त झाले तरी चालेल मी, ठाण्यातून तुमच्याविरुद्ध निवडणूक लढवतो, असे खुले आव्हान आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
नाशिक रोडवर झालेल्या सभेला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला. महिला आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती. आदित्य म्हणाले की, शिवसेनेशी झालेली गद्दारी कोणालाही पटलेली नाही. ४० गद्दार खोक्याला हात न लावता पक्ष सोडून गेले हे कोणालातरी पटेल का ? त्यांना आपल्या मतदारसंघात फिरतानाही विचार करावा लागतो. कोणतीही निष्ठा नसलेल्या मिंधे सरकारने आल्यापासून राज्यातील पाच उद्योग इतर राज्यांना दान केलेत. मुंबई सोडून राज्यातील अन्य महापालिका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या आहेत. मात्र, सामान्यांनी दिलेल्या कररुपी पैशांची उधळपट्टी चालू असल्याचा घणाघातही त्यांनी केला. राज्यातील सरकार हिंदुत्वाचे नसून गद्दारांचे असल्याचे ठणकावून सांगताना ते म्हणाले की, कोणी बरोबर असले नाही तरी मी गद्दारांविरुद्ध लढणार आहे. आपण माझ्यासोबत लढायला तयार आहात का, अशी भावनिक सादही त्यांनी नागरिकांना घातली.