न्यायालयाने दिली आगळीवेगळी शिक्षा
#मालेगाव
रस्त्यावर झालेल्या अपघातानंतर मारहाण केल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव दंडाधिकारी न्यायालयाने एका ऑटोरिक्षा चालकाला आगळी वेगळी शिक्षा दिली आहे. या प्रकरणात आरोपील दोन झाडे लावण्याची तसेच पुढील २१ दिवस दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याची शिक्षा सुनावली आहे.
रऊफ खान उमर खान हा ३० वर्षीय व्यक्ती ऑटोरिक्षा चालक असून, याच्या ऑटोने २०१० मध्ये मालेगाव शहरातील एका अरुंद गल्लीत थांबलेल्या दुचाकीला धडक दिली होती. तक्रारदाराने त्याला याबाबत विचारणा केल्यानंतर खानने त्याला मारहाण केली. त्यानंतर तक्रारीनंतर खानवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३, ३२५,५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी कलम ३२३ अन्वये खान दोषी असल्याचा न्यायदंडाधिकार्यांनी निर्णय दिला, तर उर्वरित गुन्ह्यांमधून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खानला दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवर तुरुंगवास आणि दंड न करता निर्दोष मुक्त करण्यात आले. न्यायदंडाधिकारी, तेजवंत संधू यांनी याबाबत मत मांडताना सांगितले की, प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर्स ऍक्ट, १९५८ च्या कलम ३ ने दंडाधिकार्यांना सूचना किंवा योग्य ताकीद दिल्यानंतर सोडण्याचा अधिकार दिला आहे, जेणेकरून त्याने गुन्हा पुन्हा करू नये. परंतु यावेळी न्यायालयाने असेही तर्क दिला की केवळ समज पुरेशी होणार नाही, दोषीला समज लक्षात राहणेही आवश्यक आहे. जेणेकरून तो त्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करू नये.
यावर बोलताना न्यायदंडाधिकाऱ्यांनी निरीक्षण नोंदवले की, माझ्या मते, वाजवी समज दिला म्हणजे आरोपीने गुन्हा केला आहे हे लक्षात ठेवावे. आरोपी दोषी सिद्ध झाला आणि तो गुन्हा पुन्हा करू नये हे लक्षात ठेवावे जेणेकरून याची पुनरावृत्ती होऊ नये. या निर्णयानुसार खान यांना गुन्हा घडलेल्या सोनापुरा मशिदीच्या आवारात दोन झाडे लावायची आहेत आणि झाडांची निगा राखायची आहे. तसेच इस्लामिक धर्माचे पालन करणारा माणूस असूनही तो नियमित नमाज अदा करत नसल्याची कबुली आरोपीने सुनावणी दरम्यान दिली होती. यानंतर आरोपी हा धर्माभिमानी मुस्लिम आहे आणि त्याने कबूल केले आहे की, ५ वेळा नमाज अदा करणे बंधनकारक असताना, वेळेअभावी तो अशी नमाज अदा करत नाही. हे लक्षात घेऊन न्यायालयाने दोषीला पुढील २१ दिवस नियमितपणे दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वृत्तसंस्था