अर्थसंकल्पीय अधिवेशन सरकारला जड जाणार

राज्यातील जनतेसमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत. ते सोडविण्याऐवजी हे सरकार असंवेदनशिलपणे वागत असल्याचा आरोप करीत अर्थसंकल्पीय अधिवेशन शिंदे सरकारला जड जाणार असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी (दि. २६) दिला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 27 Feb 2023
  • 11:20 am
अर्थसंकल्पीय अधिवेशन सरकारला जड जाणार

अर्थसंकल्पीय अधिवेशन सरकारला जड जाणार

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा इशारा

#मुंबई

राज्यातील जनतेसमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत. ते सोडविण्याऐवजी हे सरकार असंवेदनशिलपणे वागत असल्याचा आरोप करीत अर्थसंकल्पीय अधिवेशन शिंदे सरकारला जड जाणार असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी (दि. २६) दिला.

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी आणि पत्रकारांवरील हल्ले यासह अनेक प्रकरणांवर सोमवारपासून (दि. २७) सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत झाल्याची माहिती अंबादास दानवे यांनी विधानभवनातील पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पगार आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन केले. मात्र आजही तीच स्थिती आहे. न्यायालयाने आदेश देऊनही तसेच कर्मचाऱ्यांनी आंदोलन करूनदेखील त्यांचा पगार वेळेत होत नाही.’’

‘‘पत्रकार शशिकांत वारिसे यांची ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. संबंधित तपास करणाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. गेल्या वर्षी गणेश विसर्जनादरम्यान पोलीस ठाण्याबाहेर जमावाच्या दिशेने केलेल्या गोळीबारप्रकरणी घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस हे आमदार सदा सरवणकर यांच्या जप्त केलेल्या परवानाधारक बंदुकीतील असल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या बॅलेस्टिक अहवालातून सिद्ध झाले आहे. तरीही दोषी असलेल्या सरवणकर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. यावरून सरकार दोषींना पाठीशी घालत असल्याचे ’’ दानवे म्हणाले.

महावितरणला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारे भांडूप झोन अदानी वीज कंपनीला देऊन महावितरणचे खासगीकरण करण्याचा डाव सरकार आखत असल्याची टीकाही अंबादास दानवे यांनी केली. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराचा सुधारित आदेश केंद्राने काढावा, अशी मागणीदेखील दानवे यांनी केली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव न देता सरकार ऑस्ट्रेलियामधून कापूस आयात करून शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.  वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest