थोरांताच्या धक्क्यातून काँग्रेस सावरणार ?
#मुंबई
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीचे कवित्व काही संपता संपत नाही. माजी प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी थेट दिल्लीला पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळाला भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. या धक्क्यातून काँग्रेस पक्ष सावरणार की पुन्हा त्यात फुटीची बीजे रोवली जाणार हे आता नजीकच्या काही दिवसांत स्पष्ट होईल. सुसंस्कृत आणि समंजस नेता अशी प्रतिमा असलेल्या थोरातांच्या राजीनाम्याच्या धक्क्यांचीच राजकीय क्षेत्रात चर्चा होती.
तांबेच्या उमेदवारीवरून झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी मौन सोडत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाच त्यांनी लक्ष्य केले. तांबेच्या उमेदवारीवरून ज्या पद्धतीचे घाणेरडे राजकारण खेळले गेले ते पाहता आपणाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे बाळासाहेंबानी त्या पत्रात स्पष्ट म्हटले होते. त्याच्यापुढचे पाऊल टाकत बाळासाहेबांनी मंगळवारी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा पाठवल्याने त्याची दिल्लीश्वरांनी तातडीने दखल घेतली आहे. हा प्रश्न सोडविला नाही तर राज्यात पक्ष आणखी रसातळाला जाईल हे ध्यानी घेऊन काँग्रेसचे राज्य प्रभारी के. एच. पाटील यांना मुंबईला जाण्याचे आदेश दिल्याचे कळते. पाटील हे मुंबईत येऊन थोरातांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतील. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या नगर जिल्ह्यातील थोरात घराणे प्रथमपासून काँग्रेस विचारांशी बांधिलकी असलेले आणि जिल्ह्यातील तालेवार घराणे मानले जाते.
नाशिकच्या उमेदवारीवरून जे राजकारण रंगले आणि ते हाताळण्यात प्रदेशने त्यांना आलेल्या अपयशामुळे पक्षाची चांगलीच नाचक्की झाली. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीतील थोरातांच्या निष्क्रियतेमुळे दिल्लीत नाराजी असल्याची चर्चा आहे. पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घडवून आणण्यासाठी बाळासाहेबांनी काहीही प्रयत्न केले नसल्याची भावना आहे. त्यामुळे त्यांचे विधिमंडळ पक्षनेतेपद अडचणीत आल्याची चर्चा सुरू होती. थोरात यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवलेल्या पत्रात आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली जाते आणि परस्पर निर्णय घेतले जात असल्याचा आरोप केला असून प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या समवेत काम करणे अवघड असल्याचेही म्हटले आहे. मात्र, आपण नेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडलेला नाही आणि काँग्रेसी विचारांशी असलेली बांधिलकी कायम असल्याचेही स्पष्ट केले आहे.
उमेदवारीवरून झालेल्या गोंधळाबद्दल सत्यजित दोन पावले मागे घेऊन माफी मागायला तयार असताना प्रदेशाध्यक्ष दुसऱ्या उमेदवारासमवेत मतदारसंघात फिरत होते असे सांगून आपली बाजू मांडताना बाळासाहेब पत्रात म्हणतात की, नाना पटोले यांनी सामंजस्याची भूमिका घेतली असती तर पक्षाची प्रतिमा खराब झाली नसती. संवादाचा अभाव असताना थोडी प्रतीक्षा करण्याऐवजी त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणी बरखास्त करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. याबाबत त्यांनी पक्षनेता म्हणून किंवा जिल्ह्यातील आघाडीचा नेता म्हणून कोणतीही विचारणा केली नाही. तांबे पिता-पुत्रांना त्यांची बाजू मांडायची संधी देण्याऐवजी त्यांना निलंबित केले. शिवाय राजकीयदृष्ट्या खालच्या पातळीवरची विधाने केली. थोरात, तांबे यांच्याविषयी एवढा तिरस्कार असेल तर त्यांच्याबरोबर काम कसे करता येईल, असा प्रश्नही बाळासाहेबांनी उपस्थित केला आहे.