सुप्रिया यांनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली
सीविक मिरर ब्यूरो
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात जोरदार भाषण केल्यानंतर विरोधकांकडून त्यावर टीका केली जात आहे. महत्त्वाच्या विषयांवर न बोलता टीकाटिप्पणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ‘‘हा काय कॉमेडी शो आहे का? ही राज्याची विधानसभा आहे,’’ अशी टीका करीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची शनिवारी (दि. ४) खिल्ली उडवली.
सुप्रिया म्हणाल्या, ‘‘मुख्यमंत्री अधिवेशनात महागाईशी संबंधित विषयावर बोलतील, अशी अपेक्षा होती. पण टीका आणि इतर गोष्टींवर बोलण्यातच त्यांनी वेळ घालवला.’’ हांडेवाडीतील सुप्रियाताई लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण चांगलेच गाजले. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणती गोष्ट मिळाली नाही, असे झाले नाही. कोविडकाळात कोणी उपाशी झोपले नाही.’’ इंदापूर तालुक्यातील भांडगावमध्ये दारूबंदी झाली नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिससमोर आंदोलनाला बसणार असल्याचा इशाराही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला आहे.
‘‘आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणता. आमचे सरकार घटनाबाह्य म्हणता. मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का,’’ असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारला होता. घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती, सगळ्या सुविधा तुम्हाला चालतात, हे कसे, असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही चिमटा काढला. वृत्तसंस्था