सुप्रिया तू बोलू नको, अजितदादांनी ताईलाच केले गप्प
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. मात्र, तितक्यात ‘सुप्रिया तू बोलू नको’, असे म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंनाच शांत केले.
शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी अजित पवार म्हणाले, “सगळ्यांच्या भावना ऐकल्या, पाहिल्या. मात्र या निर्णयाबद्दल सर्वांनी गैरसमज करुन घेतला आहे. ते अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाही असे नाही”, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांचे बोलून झाल्यानंतर कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांना बोलण्याची विनंती केली. सुप्रिया सुळेही समोर बसून सर्व पाहात होत्या. मात्र त्याचवेळी अजित पवार यांनी सुप्रिया तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने तुला सांगतोय, असे म्हणत अजितदादांनी सुप्रिया सुळेंना शांत केले. दरम्यान, यावेळी कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना बोलू द्या, अशी विनंती केली.