संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनात परवानगी मिळालेली नसल्याचे समोर आले आहे. २६ जानेवारी २०२५ रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले आहेत. या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला डावलण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला विरोधकांनी घेरलं आहे.
या सगळ्या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. रोटेशन असल्यामुळे महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदाच्या संचलनात परवानगी मिळाली नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्या ठिकाणी सगळ्या राज्यांचे चित्ररथ असतात. आपल्यालाही बोलावण्यात आलेलं आहे. मात्र त्यातील १५ चित्ररथ हे रस्त्यावर असतात. बाकीचे एका ठिकाणी लोकांना बघण्यासाठी ठेवले जातात. आलटून पालटून राज्यांना संधी मिळते. गेली चार वर्षे आपल्याला संधी मिळाली होती. म्हणून या वर्षी आपल्याला संधी नाहीये.
फडणवीस पुढे म्हणाले, मागच्या मोठ्या तीन राज्यांना संधी नव्हती. त्यामुळे यामध्ये काहीही वेगळं होतंय किंवा महाराष्ट्राला डावलंल जातंय असं काही नाहीये.
तथापि, महाराष्ट्राच्या चित्ररथाला समाविष्ट करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा विनंती करून बघणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.