संग्रहित छायाचित्र
सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती ९ जानेवारीला बंद पाळतील अशी घोषणा सरपंच परिषदेने केली आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे.
राज्यभरातील सरपंच बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगमधील घटनेमुळे हादरले आहेत. समाजसेवा करणे पाप आहे का? हा प्रश्न राज्यभरातील सरपंचांना पडला असून त्यामुळे सरपंच परिषद आक्रमक भूमिका मांडत असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर सरपंच परिषदेने देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. संतोष देशमुख यांची हत्या ही अतिशय अमानुष, अमानवीय पद्धतीने झाली. यापूर्वी इतक्या अमानुषपणे हत्या कोणाचीही झाली नाही. आरोपींना कडक शासन करावे, म्हणजे परत असे पाऊल उचलण्याची कोणाची हिंमत होणार नाही, अशी मागणी सरपंच परिषदेने केली.
देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ९ जानेवारी या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद राहतील अशी माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी संरक्षण द्यावं, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत शासनाने करावी, देशमुख यांच्या कुटुंबातील एक जणाला शासकीय नोकरी द्यावी, संतोष देशमुख यांचे भव्य स्मारक गावात उभारावे अशा मागण्या परिषदेकडून करण्यात आल्या.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.