संग्रहित छायाचित्र
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र गट - ब (अराजपत्रित ) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ घेण्यात येणार आहे. या जाहिरातीमध्ये वयोमर्यादेचा गणण्याच्या तारखेमुळे राज्यातील सुमारे ५० ते ६० हजार विद्यार्थी अपात्र ठरले होते. त्यामुळे वयमर्यादेत वाढ करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर एमपीएससीने राज्य शासनावर हा निर्णय सोपविला होता. अखेर एक वर्षे वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ६ जानेवारी पर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आल्याने ५ जानेवारीला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आत्ता २ फेब्रुवारी २०२५ ला होणार आहे. तर २ फेब्रुवारी ला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा गट क ४ मे २०२५ रोजी होणार आहे.
या परीक्षेची जाहिरात ९ महिने उशीराने प्रसिध्द करण्यात आली आहे. केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या विद्यार्थ्यांचे स्वप्न अपूर्ण राहणार असल्याने एमपीएससीने स्वायत्त संस्था असलेल्या दर्जाचा वापर करत विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्याबाबतचे वृत्त सीविक मिररने प्रसिध्द केले होते. त्यानंतर एमपीएससीला जाग आल्यानंतर वयोमर्यादेबाबत निर्णय घेण्याबाबत राज्य शासनाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. त्यानंतर राज्य शासनाने वयमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र गट - ब ( अराजपत्रित ) सेवा पूर्व परीक्षा २०२४ करीता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२५ विहित केल्यामुळे सन २०२४ मध्ये पात्र होणारे सर्व विद्यार्थी अपात्र झाले होते. यास्तव कमाल वयोमर्यादेची तारीख ०१ फेब्रुवारी, २०२४ ग्राह्य धरण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट पदासाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जाणार असून तशी वेगवेगळी जाहिरात देखिल प्रसिध्द करण्यात आली आहे. शासन सेवेतील विविध संवर्गाच्या एकूण ४८० पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये सहायक कक्ष अधिकारी ५५ पदे, राज्य कर निरीक्षक -२० ९ पदे , पोलीस उपनिरीक्षक २१६ पदे इत्यादी संवगांचा समावेश करण्यात आला आहे. या जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत एकूण २ लाख ८० हजार ६५२ उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहे. आता या पदांसाठी ५ जानेवारी, २०२५ रोजी राज्यातील सर्व ३७ जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येणार होती.
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक १ फेब्रुवारी, २०२४ म्हणजेच जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून ९ महिन्या अगोदरचा दिनांक ग्राह्य धरण्याबाबत कळविण्यात आले आहे. ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८६ मधील तरतुदींशी विसंगत ठरते. तसेच महाराष्ट्र गट - ब ( अराजपत्रित ) सेवा पूर्व परीक्षा २०२४ मध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गाव्यतिरिक्त सहायक कक्ष अधिकारी व राज्य कर निरीक्षक हे दोन संवर्ग देखिल समाविष्ट आहेत. त्यामुळे एकाच जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेची गणना करण्यासाठी जाहिरातीमधील दोन संवर्गाकरीता जाहिरातीपासून पुढील तीन महिन्यानंतरचा दिनांक व एका संवर्गाकरीता जाहिरातीपासून मागील ९ महिन्यापूर्वीचा दिनांक विहित करणे उचित ठरत नाही. अर्ज स्वीकारताना संवर्गनिहाय अर्ज स्वीकारण्यात आले नसून परीक्षेकरीता संयुक्तरित्या अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यामुळे फक्त पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या वयोमर्यादा गणण्याचा दिनांक बदलणे तसेच सदर संवर्गाकरीता नव्याने अर्ज स्वीकारणे शक्य नाही. या जाहिरातीमधील वयोमर्यादा गणण्याच्या दिनांकामध्ये बदल केल्यास हा बदल या जाहिरातीतील इतर संवर्गासही लागू करावा लागेल. तसेच नव्याने अर्ज स्वीकारण्याचा निर्णय झाल्यास या परीक्षेतील इतर संवर्गासह उमेदवारांचे नवीन अर्ज स्वीकारावे लागतील.
गट - ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ चे आयोजन दिनांक ५ जानेवारी, २०२५ रोजी करण्याच्या दृष्टीने परीक्षेपूर्वी सर्व संवेदनशील पूर्व तयारी पूर्ण झालेली आहे. विचाराधीन पत्रान्वये शासनाने कळविल्यानुसार कार्यवाही करावयाचे झाल्यास वयाधिक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी द्यावी लागेल. परिणामी उमेदवारांची संख्या निश्चितच वाढेल . या परीक्षेची सर्व पूर्व तयारी जसे प्रश्नपत्रिका छपाई , जिल्हाकेंद्रांवरील उपकेंद्रे निश्चित करणे जिल्हाधिकारी कार्यालयास लेखनसामग्री पाठविणे आदी झालेली आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या वाढल्यास परीक्षेवर निश्चितच परिणाम होऊन ५ जानेवारी, २०२५ रोजी परीक्षेचे आयोजन न करता परीक्षा पुढे ढकलावी लागेल. ही बाब विचारात घेता विषयांकित परीक्षेचे आयोजन एमपीएससीला शक्य होणार नाही. असे एमपीएससीने राज्य शासनाला पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. परंतु आता वयमर्यादेते एक वर्षाची वाढ केल्याने एमपीएससीला परीक्षा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. नव्याने विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी वेळ दिल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा एमपीएससीने केली आहे.
वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५
महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ : २ फेब्रुवारी २०२५
महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- ४ मे २०२५
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.