सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनीच मारले, राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे परभणीत दाखल झाले. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सूर्यवंशी यांची हत्या ही 'कस्टोडीयल डेथ' असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मी नुकतीच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच ज्यांना मारहाण झाली त्यांची पण मी भेट घेतली. यावेळी मला काही फोटोज, व्हिडिओज तसेच पोस्ट मोर्टम रिपोर्ट दाखवण्यात आले. ही १०० टक्के पोलिस कोठडीतील हत्या आहे. पोलिसांनीच सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली. तसेच पोलिसांना मेसेज देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधीमंडळात खोटे बोलले.
या तरुणाला मारण्यात आले कारण तो दलित होता. तो संविधानचे संरक्षण करत होता. आरएसएसची विचारधारा ही संविधान संपवण्याची विचारधारा आहे, असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केली.
प्रकरणाचा तत्काळ तपास व्हावा. तसेच ज्यांचा यात सहभाग आहे त्यांना कडक शिक्षा मिळावी, अशी मागणी असल्याचे गांधी म्हणाले.
काय आहे प्रकरण
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाच्या प्रतीची एका व्यक्तीने विटंबना केली होती. या घटनेनंतर आंबेडकरी अनुयायांनी आक्रोश व्यक्त करत आंदोलन केले होते. या दरम्यान जाळपोळ आणि दगडफेक घडली. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा समावेश होता. मात्र, सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला. त्याच्या पोस्टमॉर्टम अहवालात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. या घटनेचे गंभीर पडसाद राज्यभर उमटले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.