राऊतांची पुन्हा तुरुंगवारी?
#मुंबई
हे विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही, असे वादग्रस्त विधान करने संजय राऊतांना आता चांगलेच महागात पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. राऊतांचे हे विधान सत्ताधाऱ्यांसाठी आयते कोलीत ठरले असून राऊत यांना पुन्हा कारागृहात पाठविण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्याची चर्चा आहे.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून बुधवारी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यामध्येच शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळातील घडामोडींना वेग आला आहे. राऊत हे सर्वोच्च सभागृहाचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून असे विधान पुन्हा होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान राऊत यांचे विधान चुकीचे असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील हक्कभंग समिती बरखास्त करून नवीन हक्कभंग समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीसाठी नवीन नावे मागवली आहेत. त्या दृष्टीने घडामोडींना वेग आला आहे. या समितीवर अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले यांची नावे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.
राऊत हे महाराष्ट्रात आग लावत फिरणारे कार्टे
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातील लोकप्रतिनिधींकडून त्यांच्यावर टीका होत आहे. या घडामोडीनंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे. संजय राऊत हे आगलावे आहेत. ते टेंभा घेऊन महाराष्ट्रात आग लावत फिरतात, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. संजय राऊत हे आगलावे आहेत. महाराष्ट्रात टेंभा घेऊन आग लावत हिंडणारं हे एक कार्टं आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, अशा शब्दांत शहाजीबापू पाटलांनी टीकास्त्र सोडले. वृत्तसंस्था