राणेंना बाईनं पाडलं…... बाईनं!
#मुंबई
‘‘नारायण राणे यांना बाईनं पाडलं…... बाईनं’’ अशी कोपरखळी मारत राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भलतेच खुश झाले.
अजित पवार यांनी शेलक्या भाषेत केलेल्या या टीकेमुळे राऊत यांना आनंद झाला. ‘‘दादा म्हणजे कमाल की चीज आहेत,’’ असे म्हणत त्यांनी अजित पवारांचे तोंड भरून कौतुक केले.
अजित पवार म्हणाले, ‘‘आतापर्यंत शिवसेना फोडणाऱ्यांचा विजय झालेला नाही. त्यांना जनतेने जागा दाखवलेली आहे. भुजबळांसहीत सगळ्यांना पाडण्याचे काम केले. नारायण राणेंना तर दोनदा पाडले. एकदा कोकणात आणि दुसऱ्यांदा मुंबईमध्ये वांद्रयात एका महिलेने पाडले.’’ ‘राणेंना बाईनं पाडलं... बाईनं,’ असे म्हणत पवार यांनी राणेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.
संजय राऊत यांनी अजित पवार यांचा हा व्हीडीओ ट्विट केला आहे. ‘‘दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र' ’’असे ट्विट करत राऊत यांनी पवार यांची स्तुती केली.
राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राऊत यांच्याशी त्यांचे संबंध कायमचे बिघडले. राणे यांनी आतापर्यंत अनेकदा संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत राणेंचा समाचार घेतल्याने राऊत यांना आनंद होणे साहजिक होते.
यावेळी पार्थला निवडून आणा...
वडिलांवर केलेल्या टीकेबद्दल संताप व्यक्त करीत आमदार नीतेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘अजित पवार मोठे नेते... पण वाचल्याशिवाय जमतच नाही. राष्ट्रवादीच्या स्क्रिप्टरायटर मित्रांनी जरा योग्य माहिती त्यांना लिहून दिली पाहिजे. राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले, शाम सावंत सोडून. बस, या वेळी माझा मित्र पार्थला निवडून आणा. गेल्या वेळी एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला.’’
‘‘राणेसाहेब देशाचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचले. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात... तुमचा आवडता टिल्लू.’’ अशा खोचक शब्दांचे ट्विट करीत नीतेश राणे यांनी अजित पवारांना डिवचले. वृत्तसंंस्था