कांद्याने केला सत्ताधाऱ्यांचा वांधा

जगभरात कांद्याची टंचाई निर्माण झालेली असताना महाराष्ट्रात तो बऱ्यापैकी उपलब्ध आहे. तरीदेखील निर्यातीला प्रोत्साहन देण्याऐवजी केंद्र सरकारने निर्यातबंदी लादलेली आहे, तर दुसरीकडे कांद्याला भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी चिडले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आधीच विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या सरकारविरोधात कांदाप्रश्नी रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 5 Mar 2023
  • 01:57 am
कांद्याने केला सत्ताधाऱ्यांचा वांधा

कांद्याने केला सत्ताधाऱ्यांचा वांधा

निर्यातीवरील निर्बधांमुळे चिडलेल्या शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक, रास्ता रोको आंदोलन

#मुंबई 

जगभरात कांद्याची टंचाई निर्माण झालेली असताना महाराष्ट्रात तो बऱ्यापैकी उपलब्ध आहे. तरीदेखील निर्यातीला प्रोत्साहन देण्याऐवजी केंद्र सरकारने निर्यातबंदी लादलेली आहे, तर दुसरीकडे कांद्याला भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी चिडले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आधीच विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या सरकारविरोधात कांदाप्रश्नी रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहे. टंचाईमुळे जगात कांद्याची मागणी वाढलेली असतानाच भारतात मात्र या पिकाच्या निर्यातीवर निर्बंध आहेत. याचबरोबर राज्यात कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे दर घसरत आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटाचा सामना करत आहे. या शेतकऱ्यांच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी कांदाप्रश्नी  शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. संगमनेरमध्ये काॅंग्रेस नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे.  

कांद्याच्या निर्यातीवर वारंवार निर्बंध लादले जात असल्याने त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होत आहे. १० वर्षांनंतरही कांद्याच्या निर्यातीत अपेक्षित  वाढ झालेली नाही. कांद्याचे भाव गडगडल्याने विरोधकांनी विधानसभेत मागणी करूनही सरकारने अद्यापही शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे मविआचे नेते शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. संगमनेर बस स्थानकासमोर कांदा आणि वीज प्रश्नाबाबत आंदोलन केलं जात आहे.

‘‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकार केवळ आश्वासने देत आहे. हे वगळता ते काहीही करत नाहीत,’’ अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केली. एकीकडे देशात कांद्याचे उत्पादन वाढत असताना भाव मिळत नसल्याने शेतक-यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने कांदा निर्यातीमधील हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  

अहमदनगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. यात सहभागी झालेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कांद्याच्या भावावरून शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला. ‘‘कांद्याचे भाव पडले असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या प्रश्नावर सरकारने थातूरमातूर उत्तर देत समिती नेमण्याचे आश्वासन दिले आहे. ही समिती नेमेपर्यंत लहान शेतकरी कांदा विकेल. कारण त्याला पर्याय नसतो. हा कांदा व्यापाऱ्यांकडे जाईल. मग सरकार व्यापाऱ्यांचे हित साधणारा निर्णय जाहीर करेल,’’ अशी टीका जयंत पाटील यांनी केली. कांद्यावर निर्यातबंदी नसल्याचे राज्य सरकारने सभागृहात सांगितले आहे. मग कांद्याची निर्यात का होत नाही, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.  

तीन एकराच्या कांदा पिकावर फिरवला नांगर

कांद्याने यंदाही शेतक-यांना रडवले आहे. कवडीमोल भाव मिळत असल्याने तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा गावातील एका शेतकऱ्याने वैतागून आपल्या तीन एकराच्या कांदा पिकावर नांगर फिरवला आहे. अपसिंगा गाव कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील २ हजार ५०० हेक्टरपैकी १ हजार ४८० हेक्टर जागेवर यंदा कांद्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र बाजारात कांद्याला भाव नाही. काढणीचा खर्चही निघत नसल्याने श्रीहरी भाकरे या शेतकऱ्याने आपल्या शेतात तीन एकर जागेवर पेरलेल्या कांद्याच्या पिकावर नांगर फिरवला. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest