नदी प्रदूषणात महाराष्ट्र अव्वल
#मुंबई
देशभरातील नद्यांचा प्रदूषण पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला असून नदी प्रदूषणामध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. या अहवालानुसार, महाराष्ट्रातील नद्या यामध्ये सर्वाधिक प्रदूषित आहेत.
देशभरातील ६०३ नद्यांच्या प्रदूषण पाहणीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ५५ पट्टे महाराष्ट्रातील आहेत. या अहवालानुसार, देशातील नदी प्रदूषणात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असल्याने राज्यातील प्रदूषणाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट होते. कृष्णा नदी उगमानंतर काही किलोमीटर अंतरातच मोठ्या प्रमाणात प्रदूषित असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
देशातील मोठ्या नद्यांच्या यादीत कृष्णेचे नाव अग्रभागी आहे. नदीच्या उगमानंतर अवघ्या काही अंतरात सातारा जिल्ह्यात या नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याचे आढळून आले. पुढे कृष्णा नदी सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. या जिल्ह्यातील सुमारे १० ते १२ सहकारी साखर कारखाने नदीच्या काठावर असल्याने या नदीच्या प्रदूषणात वाढ होते. कृष्णेचे पाणी पिणाऱ्यांना ‘लिव्हर सिरॉसिस’ हा आजार असल्याचे दिसून येते. तसेच कृष्णेच्या पाण्यात कॉस्टिक सोडा, स्पेंट वॉश आणि मळीचे प्रमाणदेखील सर्वाधिक आहे.
नदी प्रदूषणात महाराष्ट्रापाठोपाठ शेजारी राज्य मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात १९ पट्टे प्रदूषित आढळले आहेत. बिहार १८ पट्ट्यांसह तिसऱ्या स्थानी आहे. केरळमध्ये १८, कर्नाटकात १७, उत्तर प्रदेशात १७, राजस्थानात १४ तर गुजरातमध्ये १३ दूषित पट्टे आढळले आहेत. महाराष्ट्रातील नद्यांच्या अहवालात अतिप्रदूषित गटात चार पट्टे आढळून आले. त्यात कृष्णा नदीचाही समावेश आहे. भीमा, गिरणा, गोदावरी, गोमती, हिरवा, इंद्रायणी, काळू, कोयना या नद्याही अनेक पट्ट्यांत प्रदूषित झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वृत्तसंंस्था