मदतीसाठी धावलेल्या आजीबाईंना दोन भामट्यांनी लुबाडले
# मुंबई
मुंबई म्हणजे स्वप्ननगरी. प्रत्येकजण आपल्या स्वप्नामागे धावत असतो. हे चक्र अखंड सुरू असते आणि स्वप्नपूर्तीसाठी भारताच्या काना-कोपऱ्यातून आलेला प्रत्येकजण सेकंदा-सेकंदाच्या हिशोबाने पळत असतो. अशा या मुंबईत मदत करण्याची इच्छा असली तरी कोणाला वेळ नसतो. एखाद्याने मदत केली तर त्याला कोणता अनुभव येईल हे सांगता येणार नाही.
रेल्वे स्थानकाकडे जाण्यास पैसे नसल्याचा बहाणा करणाऱ्या दोघांनी एका वृद्धेस असाच हात दाखवला आणि या वृद्धेला कोठून मदतीसाठी पुढे आलो असा पश्चात्ताप झाला. भाईंदर पश्चिमेला पोद्दार शाळेसमोरील शिवमहिमा इमारतीत ७२ वर्षांच्या सरस्वती गुप्ता राहतात. त्यांचा मुलगा पानाचे दुकान चालवतो. त्याला जेवणाचा डबा देऊन परत येत असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांना भेटल्या. आपण बिहारचे असून कामावरून काढून टाकल्याने पैसे नाहीत. आम्हाला रेल्वे स्थानकावर रिक्षाने सोडा असा बहाणा केला. मदतीच्या भावनेने त्यांनी दोघांना रिक्षात घेतले. खाली उतरल्यावर त्यांनी सरस्वती यांना गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील दागिना चोरीला जाईल अशी भीती घातली. यानंतर सरस्वती यांनी दागिने एकाने दिलेल्या रुमालात बांधून ठेवले. ते दोघे निघून गेल्यावर सरस्वती यांनी रुमाल उघडून पाहिले असता त्यात ८० हजारांच्या दागिन्याऐवजी दगड आढळले. भाईंदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.