काँग्रेसचे हात दाखवून अवलक्षण

कधीकाळी महाराष्ट्रावर एक हाती सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसची अवस्था गेल्या काही वर्षांत खालावत चालली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारीवरून जो घोळ घातला गेला त्यामुळे तर पक्षाची प्रतिमा आणखीनच खालावली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 6 Feb 2023
  • 04:24 pm
काँग्रेसचे हात दाखवून अवलक्षण

काँग्रेसचे हात दाखवून अवलक्षण

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघामधील उमेदवारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा

# नाशिक

कधीकाळी महाराष्ट्रावर एक हाती सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसची अवस्था गेल्या काही वर्षांत खालावत चालली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारीवरून जो घोळ घातला गेला त्यामुळे तर पक्षाची प्रतिमा आणखीनच खालावली आहे. मतदार काँग्रेसकडे आशेन पाहात असताना हा सावळागोंधळ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाला परवडणारा नाही, हेही भान नेत्यांना राहिले नाही ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. राज्य पातळीवरील नेत्यांनी म्हणजेच प्रदेशाध्यक्षांनी हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले ते पाहता नाशिकमध्ये काँग्रेसने हात दाखवून अवलक्षण करून घेतले असे म्हणावे लागेल. अजूनही या प्रकरणी तांबे आणि पटोले जी विधाने करत आहेत त्यावरून अवलक्षणाचे आणखी धागेदोरे नजीकच्या काळात बाहेर येतील असे म्हणावे लागेल.     

भारतीय जनता पक्ष जेथे आपले उमेदवार हमखास निवडून येईल असा विश्वास बाळगून होते अशा नागपूर आणि औरंगाबाद मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार फार प्रयत्न न करताही निवडून आले. गेल्या विधानसभा निवडणुकीतही मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला फार चमकदार यश मिळत नसताना विदर्भाने हात दिला. या दोन्ही यशासाठी काँग्रेसचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते एकजुटीने काम करताना दिसत नव्हते. अशा स्थितीत मिळालेल्या यशावरून मतदार आजही काँग्रेसला विसरलेले नाहीत किंवा पर्याय म्हणून पक्षाकडे पाहतात हेच सिद्ध होते. मात्र, हातात येऊ पाहणारे यश काँग्रेसला स्वीकारतानाही अडचणी येत आहेत, असेच दिसते. नाशिक पदवीधर मतदारसंघात राज्य नेतृत्वाने थोडे जरी राजकीय चातुर्य दाखवले असते तर अपक्ष म्हणून राहण्याचा निधार्र व्यक्त करणारे सत्यजीत तांबे आज काँग्रेसचे आमदार म्हणून ओळखले गेले असते.

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळलेले सत्यजित तांबे नाशिकमधील उमेदवारीसाठी इच्छुक असताना आणि त्यांचे वडील आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही मुलाला उमेदवारी देण्यास अनुकूलता दर्शवली असताना दरबारी राजकारणातून काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने तेथे आपले हसे करून घेतले आहे. सत्यजीत यांचे मामा म्हणजे बाळासाहेब थोरात हे नगरमधील व राज्यातील तालेवार राजकीय घराणे. बाळासाहेबांचे दिल्लीतील उच्चपदस्थ नेत्यांशीही चांगले मधुर संबंध. मात्र, केवळ राहुल गांधी यांच्या मर्जीमुळे प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालेले नाना पटोले यांना राज्यातील जुन्या जाणत्या नेत्यांना समवेत घेऊन पक्षाला पुढे नेण्यात यश मिळत नाही असे दिसते. नानांचे बाळासाहेबांशी जसे जमत नाही तसेच माजी मुख्यमंत्री आणि मराठवाड्यातील तालेवार नेते अशोक चव्हाण यांच्याशीही जमत नसल्याची चर्चा आहे. दिल्लीसमोर आपली रेष मोठी असल्याचे दाखविण्याच्या नादात नाशिकमधील घोळ झाल्याचे आता दिसत आहे. नाशिक मतदारसंघात आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवल्यावर उमेदवारीच्या एबी फॉर्मवरून जो गोंधळ घातल्याचा आरोप सत्यजीत यांनी केला आणि त्याला काँग्रेसच्या राज्य प्रवक्त्यांनी जे उत्तर दिले त्यामुळे तर पक्षाच्या प्रतिमेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. देशभर सत्तेचा वारू चौफेर उधळत असलेल्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या बालेकिल्ल्यात धूळ चारण्याची कामगिरी केलेल्या काँग्रेसच्या प्रतिमेत सुधारणा होण्याची शक्यता असतानाच नाशिकमधील सावळ्यागोंधळाने पक्षातील अंतर्गत धूसफूस किती तीव्र आहे आणि एकाच पक्षातील नेते कसे परस्परांच्या विरोधात दरबारी राजकारण करत आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत आहेत हे दिसून आले. बाळासाहेब थोरात मौन बाळगून असताना तांबे यांनी केलेले आरोप, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी केलेले खुलासे आणि यावर नाना पटोले यांना दररोज कराव्या लागणाऱ्या खुलाशांमुळे पक्षाची तथाकथित एकी उघड झाली आहे. बाळासाहेबांच्या मौनाचा नेमका अर्थ आजही भल्या भल्यांना समजलेला नाही. भारतीय जनता पक्ष एखादी निवडणूक किती गांभीर्याने घेतो आणि त्यांची यंत्रणा कशी कामाला लावली जाते हे माहीत असतानाही सत्तेवर येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसच्या अब्रूचे नाशिकप्रकरणी धिंडवडे निघाले आहेत असे म्हणावे लागेल.   

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest