‘वर्षा’वर चहात सोन्याचे पाणी असते का?
#मुंबई
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या बंगल्याचे खानापानाचे चार महिन्यांचे बिल तब्बल २.३८ कोटी रुपये दाखविण्यात आले आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘‘वर्षा बंगल्यावर चहामध्ये सोन्याचे पाणी घालतात का,’’ असे सुनावत जोरदार टीका केली.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून (दि. २७) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २६) महाविकास आघाडीतर्फे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात शिंदे-फडणवीस सरकार वैयक्तिक चमकोगिरीसाठी करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. ते म्हणाले, ‘‘वर्षा बंगल्याचे चार महिन्यांचे खानपानाचे बिल २.३८ कोटी रुपये आले. मीसुद्धा उपमुख्यमंत्री होतो. आमचे सहकारी मुख्यमंत्री होते. परंतु एवढे बिल कधीच आले नाही. चारच महिन्यात एवढे बिल कसे? चहामध्ये सोन्याचे पाणी घातले होते का? काही कळायला मार्ग नाही. शिंदे-फडणवीस सरकार वैयक्तिक चमकोगिरीसाठी करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. ’’
राज्य सरकारने मागील ८ महिन्यांत जाहिरातींवर तब्बल ५० कोटी रुपयांचा खर्च केल्याचेही अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत निदर्शनास आणून दिले. ‘‘मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार तेथेही १७ कोटी रुपये जाहिरातबाजीवर खर्च करण्यात आले. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले परंतु, पानभर जाहिराती देऊन वैयक्तिक चमकोगिरीसाठी जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी होत आहे,’’ असा हल्लाबोल त्यांनी केला.
काॅंग्रेस पक्षाचे सध्या रायपूरमध्ये राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. यामुळे महाविकास आघाडीतर्फे आयोजित संयुक्त बैठकीत काॅंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आम्ही बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा फोनवरून केली, असे पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. अजित पवार म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा झाली. सरकार मदत करणार नसेल. लक्ष देत नसेल तर माझ्याकडे पावत्या आहेत. त्यात अतिशयोक्ती नाही. एक क्लिप आली. त्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था सांगण्यात आली आहे. मी म्हणतो अशाप्रकारे शेतकऱ्यांवर दुर्दैवी प्रसंग यायला नको. आपला कांदा परदेशात जायला हवा. शेतकऱ्यांचा किमान खर्च तरी निघायला हवा.’’वृत्तसंंस्था