राज्यात राष्ट्रपती राजवटीचे संकेत
#नाशिक
मध्यावधी निवडणुका कधी होतील, हे सांगता येणार नाही. मात्र सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजप राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे सांगत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीचे संकेत शनिवारी (दि. २५) दिले.
नाशकात पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप पैशांचा वापर करीत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘‘भाजप मोठ्या प्रमाणावर पैसे वाटत असल्याची लोकांमध्ये जोरदार चर्चा आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. असे असूनही जनता त्यांना वैतागली आहे. या पाेटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट होणार असल्याचे या मतदारसंघातील नागरिक सांगत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे. पण येत्या महिन्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते का, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. लोकांच्या विरोधानंतर राज्यपाल बदलण्यात आले. नवीन राज्यपाल आल्यावर सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे.’’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही रोहित पवार यांनी टीका केली. ‘‘ते आज काय बोलतील आणि उद्या काय बोलतील, हे राजकारणाच्या परिस्थितीवर अवलंबून असते. विधान परिषद निवडणुकीत भाजपची जी परिस्थिती झाली आहे, त्यावरून लोकं त्यांच्या विरोधात आहे, असं वाटतं,’’ असं ते म्हणाले. पहाटेच्या शपथविधीवरूनही त्यांनी टोले लगावले. आज लोकांना काय हवंय यावर चर्चा केली पाहिजे. त्याऐवजी भाजपकडून सहानुभूती मिळवण्यासाठी केवळ भावनिक राजकारण सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. भावी मुख्यमंत्री म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत, या मुद्द्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘कार्यकर्ता काय लावतो, हा विषय आहे. प्रेमापोटी हे सगळं होत असतं. मात्र, निर्णय घेताना सर्व नेते एकत्रित निर्णय घेतात. विरोधी पक्षाकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते असे विषय काढत आहेत.’’ भाजपचे नेते नीलेश राणे यांनी कमरेखालच्या भाषेत ट्विट केलं होतं. त्यावरही ‘‘ज्या व्यक्तींना सभ्य भाषा माहीत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार,’’ असा उलट सवाल त्यांनी केला. विकास कुणी केला, हे लोकांना माहीत आहे. सध्या गुंडागर्दी सुरू आहे. लोकं विकासाच्या बाजूने निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे. राजकारण, सरकारचे निर्णय आणि निवडणुका याचे योगायोगाने टायमिंग साधलं जात आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
भाजपमध्ये काय खदखद आहे, हे आपण बघतो. निष्ठावंत लोकांना तिथे संधी दिली जात नाही. एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत का? या गोष्टी अयोग्य आहेत. सर्व समाजासाठी एकत्रित धोरण ठरविणे गरजेचे आहे. इतर समाजाचेदेखील प्रश्न प्रलंबित आहेत,’’ अशा शब्दांत पवार यांनी ‘मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून गद्दारी केली,’ असे सांगणाऱ्या गुलाबराव पाटील यांना सुनावले.वृत्तसंंस्था