इक्बालसिंह चहल
# मुंबई
करोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची सुमारे चार तास चौकशी केली. चौकशीनंतर चहल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत कोविड काळात महापालिकेने केलेल्या कामांची माहिती दिली. त्याचबरोबर ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनुसार ईडीने हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर नुकतेच छापे टाकले. त्यानंतर सोमय्यांनी मुंबई महापालिकेने कोविड-१९ काळात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबई महापालिकेने कोविड काळात कंत्राट दिलेल्या सुजीत पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ईडीने मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांना नोटीस पाठवली होती. त्यानुसार चहल ईडीच्या कार्यालयात हजर झाले.
चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त चहल म्हणाले, “मार्च २०२० मध्ये जेव्हा भारतात कोविडचा शिरकाव झाला. तेव्हा आपल्याकडे केवळ ३ हजार ७५० बेड होते. मुंबईची लोकसंख्या १ कोटी ४० लाख असताना हे बेड फार कमी होते. त्या काळात मुंबईत करोना संसर्गाचे लाखो रुग्ण आढळतील, असा एक अंदाज वर्तवण्यात आला होता. हा अंदाज पुढे खराही ठरला. मुंबईत ११ लाख कोविड रुग्ण आढळले.”