माझ्या पाच महिन्यांच्या बाळाला धुळीमध्ये कसे ठेवायचे?
#मुंबई
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी विधानभवनातील हिरकणी कक्षाची दूरवस्था समोर आली. ‘‘माझे पाच महिन्यांचे बाळ सध्या आजारी आहे. येथील हिरकणी कक्षात मोठ्या प्रमाणात धूळ असताना मी त्याला येथे कसे ठेवू,’’ असा सवाल करताना आमदार सरोज अहिरे यांना अश्रू अनावर झाले होते.
शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यादेखील उपस्थित आहेत. हिरकणी कक्षाची अतिशय वाईट अवस्था पाहून त्या भावूक झाल्या.
अहिरे म्हणाल्या, ‘‘माझ्या मतदारसंघासाठी न्याय मागायला मी आले आहे. नागपूरलाही मी माझ्या बाळासहीत गेले होते. तो माझ्याशिवाय राहू शकत नाही, तो केवळ पाच महिन्यांचा आहे. मागच्या महिन्यात मागणी केल्यानुसार मला एक कक्ष देण्यात आले. मात्र या ठिकाणी कुठल्याही सोयीसुविधा नाहीत. येथे खूप धूळ आहे, पाळणा नाही, सोफ्याचे कव्हर फाटलेले आहेत. माझ्या बाळाची तब्येत गेल्या तीन दिवसांपासून खराब आहे. अशा ठिकाणी मी त्याला कसे ठेवू?’’
‘‘हे सरकार फक्त शिंदेंचे आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नाही. हिरकणी कक्षात जर आज बदल केले नाही तर मला परत जावे लागेल. माझ्या जनतेच्या प्रश्नांसाठी मला काहीही करता येणार नाही,’’ असे सांगत अहिरे यांनी विधानभवनातून निघून जाणे पसंत केले. अहिरे या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही आपल्या बाळासह आल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते. त्या घटनेच्या निमित्ताने विधानभवनात हिरकणी कक्ष सुरू करत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरल्याचे स्पष्ट झाले.वृत्तसंंस्था