रडवणाऱ्या कांद्यावर रोटर फिरवण्यासाठी अनुदान द्या
#अहमदनगर
कांद्याच्या उत्पादनाला मिळणाऱ्या दरामुळे राज्यातील शेतकरी उध्वस्त होत असून पिकावर रोटर फिरवत आहेत. पिकांवर रोटर फिरवण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी जामखेडच्या शुभम वाघ या युवा शेतकऱ्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. यासाठी त्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे
शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा निम्मीही किंमत मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी उभ्या पिकामध्ये रोटर फिरवत आहेत. शेतात कोणत्याही पिकाचे उत्पादन घ्यायचे असेल तर प्रचंड पैसा खर्च करावा लागत आहे, पण त्यातून मुबलक आर्थिक उत्पन्न मिळत नाही.त्यामुळे अलीकडेच एक शेतकरी बाजारात कांदा विकण्यासाठी गेला असता त्याला ५०० ते ६०० किलो कांद्यासाठी केवळ दोन रुपयांचा धनादेश देण्यात आला. ही परिस्थिती केवळ कांदा उत्पादकांचीच नाही तर कोबी, फ्लॉवर, केळी यांसारखी पीके घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची आहे. उत्पादनाला दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी थेट पिकात रोटर फिरवत आहेत. आता उभ्या पिकांवर रोटर फिरवण्यासाठी तरी अनुदान द्या, अशी मागणी शुभम गुलाबराव वाघने केले आहे. तो अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवाशी आहे.
काय आहे शुभमची मागणी
आज शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने उभ्या पिकात रोटर फिरवावा लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजारात चेष्टा केल्याप्रमाणे ५०० ते ६०० किलो कांदा विकून फक्त दोन रुपयांची पट्टी हातात मिळतेय. कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. एकीकडे महागाई वाढल्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. पण खर्चाच्या निम्म्या रक्कमेइतकाही नफा शेतकऱ्यांना मिळत नाही. आता शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतो आहे. शेतात साधा रोटर फिरवायचा म्हटला तरी २००० ते २५०० रुपये खर्च येतो. जिथे मोठ्या आशेने लावलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने त्या पिकात आज शेतकरी रोटर फिरवत आहे. जिथं शेतमाल विकला नाही, तर तिथे शेतकऱ्याला रोटर फिरवायलाही उसनवारी करावी लागतेय. शेतीमालाला चांगला दर मिळाला तरी ही वेळ शेतकऱ्यांवर येणार नसल्याचे त्याने पत्रात म्हटले आहे. वृत्तसंस्था