पालकमंत्र्यांना शोधा अन् ५० खोके मिळवा
#अमरावती
जिल्ह्यातील शेतकरी अनेक अडचणींचा सामना करीत असताना सरकारचे या प्रश्नांकडे दुर्लक्ष असून जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ एक बैठक घेतली आहे, तेव्हापासून त्यांनी अमरावती जिल्ह्यात पाय ठेवलेला नाही, अशी टीका करीत ठाकरे गटाच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले.
'पालकमंत्री शोधा आणि ५० खोके मिळवा' असे जाहीर करून त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केवळ एकदाच बैठक घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील कुठल्याही समस्यांची दखल त्यांनी घेतली नाही. पालकमंत्री बेपत्ता झाले आहेत, असा आरोप युवा सेनेचे पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख सागर देशमुख आणि युवा सेना उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांनी केला. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील पालकमंत्री कार्यालयावर धडक दिली. पोलिसांना चुकवून कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवले आहे. मात्र त्यांना अमरावती जिल्ह्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यांच्या अशा कारभारामुळे अमरावती जिल्ह्याचा विकास ठप्प पडला आहे. पालकमंत्र्यांचा वचक नसल्याने प्रशासकीय अधिकारी निर्धास्त आहेत. सर्वसामान्यांची अनेक कामे खोळंबली आहेत, असा आरोप देखील युवा सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सातत्याने आंदोलन करणाऱ्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा सध्या गप्प आहेत. राणा दाम्पत्य जिल्ह्याची परिस्थिती सुधारावी यासाठी हनुमान चालीसा पठण केव्हा करणार, असा प्रश्नदेखील सागर देशमुख यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना नंतर ताब्यात घेतले.