संग्रहित छायाचित्र
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा आणि चित्रपट निर्माता राज कुंद्रा यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाने (ED) छापा टाकला आहे. हा छापा सांताक्रूज येथील घरावर टाकण्यात आला आहे. ईडीचे अधिकारी शुक्रवारी (29 नोव्हेंबर) सकाळी 6 वाजता शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचले. ही छापेमारी पॉर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज कुंद्रा सोबतच या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींवरही ईडीने कारवाई केली आहे. यापूर्वीही शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती.
राज कुंद्रा याला जून 2021 मध्ये ‘अश्लील’ चित्रपट तयार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी दावा केला होता की, राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार होता. दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर सप्टेंबर 2021 पासून तो जामिनावर बाहेर आहे.
राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने पॉर्न चित्रपटांद्वारे मोठी कमाई केली. 4 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई पोलिसांनी या संदर्भात मालवणी पोलीस ठाण्यात एक प्रकरण नोंदवले होते. एका मुलीने तक्रार दाखल करत काही लोक अशा प्रकारे चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणींना अश्लील चित्रपट बनवण्यास भाग पाडत असल्याची माहिती दिली होती.
तक्रारीनुसार, या लोकांनी मुलींना जबरदस्तीने अश्लील चित्रपटांत काम करण्यास भाग पाडले आणि या चित्रपटांचे शूटिंग करून त्यातून मोठा नफा मिळवला. यानंतर पोलिसांनी मालाड वेस्टमधील एका बंगल्यावर छापा टाकला. या बंगल्यात पॉर्न चित्रपटांचे शूटिंग सुरू होते. या छाप्यात एका बॉलिवूड अभिनेत्रीला पकडण्यात आले आणि 11 जणांना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर पोलिसांना राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीविषयी माहिती मिळाली. परंतु अटकेपूर्वी पोलिसांनी ठोस पुरावे गोळा करण्याचे ठरवले. पोलिसांकडे पीडित मुलींची विधाने, व्हॉट्सअॅप चॅट, अॅपवर उपलब्ध चित्रपट आणि राज कुंद्रा याच्या अश्लील चित्रपटांच्या व्यवसायाचे सर्व तपशील होते. या पुराव्यांच्या आधारे राज कुंद्रा याला अटक करण्यात आली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.