देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा सक्रीय झाले आहेत. विधानसभा निवडणुक काळात जरांगे पाटील म्हणावे तसे सक्रिय नसल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, जरांगे पाटील पुन्हा आंदोलन छेडणार आहेत. 25 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. मी राहू न राहू याची परवा नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मनोज जरांगे गेल्या दोन दिवसांपासून परभणीत आहेत. या दौऱ्यादरम्यान जरांगे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले. यावेळी त्यांनी 25 जानेवारी पासून पुन्हा उपोषणाला बसणार आहे असं सांगितले. तसेच, मी राहू न राहू पण आरक्षणासाठी लढा देणार आहे. मराठा आरक्षणाचा विषय मिटला की शेतमालाला भाव हे कसे देत नाही तेही बघतो आणि धनगर आणि मुस्लिम आरक्षण ही कसे मिळत नाही तेही पाहणार असल्याचं मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
फडणवीसांवर साधला निशाणा
25 जानेवारी 2025 पासून आम्ही अंतरवालीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहोत. 25 जानेवारीच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल, असा इशारा मनोज जरांगेंनी फडणवीस सरकारला दिलाय. तर 25 जानेवारी रोजी राज्यभरातील मराठ्यांनी अंतरवलीकडे यायचं. मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवा. सर्वांनी स्वतः हा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करा. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे.
माझं गाव माझी जबाबदारीप्रमाणे आपणच आपल्या गावात बैठका करायच्या आहेत. सर्वांनी पत्रिका छापायच्या, प्रत्येक घरात जाऊन आमंत्रण द्यायचं. 25 जानेवारी 2025 ला कोणीही लग्नाची तारीख धरू नये, त्या दिवशी वाहानेच मिळणार नाहीत, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.