सत्ता गेल्याने डोळ्यांसमोर अंधारी
#मुंबई
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर काहीच काम केले नाही, असे विरोधकांना वाटणे साहजिक आहे. कारण, सत्तेतून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आहे, अशी टीका करीत राज्य सरकारने केलेल्या कामांची जंत्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत वाचून दाखवली.
आमचं सरकार सकारात्मक निर्णय घेतंय, असं नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सुरू केला. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’चा नागरिकांना लाभ होत आहे. मुंबईत मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ प्रकल्पाचा शुभारंभ केला. आतापर्यंत ६० लाख प्रवाशांनी मेट्रो प्रवासाचा फायदा घेतला. समृद्धी महामार्ग हा प्रकल्प तर गेमचेंजर ठरला आहे.’’ तुम्ही अभिभाषणावर बोलाल अशी अपेक्षा होती. विरोधकांनी विरोधकासारखं बोललं पाहिजे. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे. आम्ही जे काम करतो ते तुम्हाला दिसत नाही, असा हल्लाबोलही शिंदे यांनी विरोधकांवर केला.
कांद्याच्या निर्णय चर्चेप्रमाणे घेतला. नाफेडने खरेदी सुरू केली आहे. बांगलादेशात निर्यात कर लावला आहे. रेल्वेने कांदा जातो. त्यासाठी रेल्वेमंत्र्यांशी बोलू. मराठा आरक्षण देण्याचा निर्णय झाला. उच्च न्यायालयानं तो वैध ठरवला. महाविकास आघाडीच्या काळात त्याला स्थगिती मिळाली. तज्ज्ञ वकिलांची फौज आम्ही तयार करतोय. तोपर्यंत त्यांच्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. अडीच हजार नियुक्त्या देण्याचं काम केलं. मराठा समाजासाठी न्यायालयीन लढाई ताकदीनं लढत आहोत. सर्वांना सोबत घेऊन खंबीरपणे उभे आहोत, असेही शिंदे
यांनी सांगितले.
दाओसमधून येणार १.३७ लाख कोटींची गुंतवणूक
दावोसमधून एक लाख ३७ हजार कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक येणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी दावोसच्या दौऱ्यावर ८० कोटी रुपये खर्च केले. मात्र त्यांना १० हजार कोटींचीही गुंतवणूक आणली नाही. दावोूस दौऱ्यासाठी आम्हाला ३० ते ३५ कोटी खर्च आला. त्या बदल्यात तब्बल एक लाख ३७ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. तत्कालीन महाविकास आघाडीने दौऱ्यावर ८० कोटी खर्च करुन १० हजार कोटींची गुंतवणूक आणली नाही, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला
सध्या केंद्र आणि राज्य एकमेकांच्या विचाराने काम करत आहे. परदेशी गुंतवणूक येत आहे. एक लाखापेक्षा जास्त रोजगार मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर राज्यात उद्योग आले पाहिजे. रोजगार निर्मिती झाली पाहिजे. एनर्जी सेक्टरमध्ये गेल्यावेळी एमओयू ५० हजार कोटी रुपयांचा झाला होता. पण, तिथून एकही रुपयाची गुंतवणूक झाली नाही. आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल. त्यातून रोजगार निर्मिती होईल. राज्य सरकारने राज्याच्या हितासाठी निर्णय
घेतले आहेत.
दावोसमध्ये स्थानिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार केल्याच्या तसेच महाराष्ट्रातील गुंतवणूक इतर राज्यात गेल्याच्या आरोपांवर शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘‘राज्यात आता गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीची काय परिस्थिती होती, त्यावर श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय झाला आहे. आम्ही सत्तेत येताच मोठ्या प्रमाणावर कामे सुरु केली. परंतु ही कामे विरोधकांना दिसत नाही. कारण सत्तेतून पायउतार झाल्यावर विरोधकांच्या डोळ्यात अंधारी आली आहे,’’ असा हल्लाबोल त्यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ८० हजार कोटी रुपयांचे २४ करार झाले होते. आमच्या सरकारने १.३७ लाख कोटी रुपयांचे १४ करार केले. आम्ही दोन दिवस दावोसमध्ये तळ ठोकून तत्कालीन मविआपेक्षा ५८.३९ टक्के अधिक गुंतवणूक आणली, असा दावादेखील मुख्यमंत्र्यांनी केला.वृत्तसंस्था